अहमदनगर : जिल्ह्यातील ४८ विकास संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या टप्प्यावर स्थगित झाली होती. या संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या टप्प्यांपासून सुरू होणार असून, उर्वरित पहिल्या टप्प्यातील १०८ विकास संस्थांच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्यात येणार आहेत. तसा आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी साेमवारी काढला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून या निवडणुकांना स्थगिती होती. कोरोनाची लाट ओसरू लागल्याने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना दिलेली स्थगिती उठविली आहे. ज्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या टप्प्यावर स्थगित झाली होती, आशा संस्था वगळता उर्वरित विकास संस्थांच्या मतदार नव्याने तयार करण्याचे आदेश सहकार प्राधिकरणाने दिले आहेत. जिल्ह्यातील ४८ विकास संस्थांची निवडणूक प्रक्रिया नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या टप्प्यावर स्थगित झालेली. या संस्था वगळून उर्वरित संस्थांच्या मतदारयाद्या ३१ ऑगस्ट २०२१च्या अर्हता दिनांकावर पुन्हा नव्याने तयार करण्याच्याही सूचना करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील आशा संस्थांची संख्या १०८ असून, या संस्थांच्या मतदारयाद्या नव्याने तयार केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या काळात मुदत संपलेल्या संस्थांची ८८८ इतकी असून, पहिल्या टप्प्यात १५६ संस्था निवडणुकीस पात्र ठरल्या होत्या. यापैकी ४८ संस्थांच्या सभासदांकडून नामनिर्देशन पत्रही मागविण्यात आले होते. या संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत होती. असे असतानाच निवडणुकीला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे ४८ संस्थांच्या सभासदांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत दिली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
....
थकबाकीदारांना मिळणार संधी
विकास संस्थांच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्यात येणार आहेत. पूर्वीच्या मतदारयादीत अपात्र ठरलेले थकबाकीदार नवीन यादी तयार करताना पात्र ठरू शकतात. दोन वर्षांत जे सभासद कर्जमुक्त झाले आहेत, अशा सभासदांना मतदान करण्याची संधी यानिमित्ताने मिळणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.