राजूर : तालुक्यातील पर्यटन विकासाचा आराखडा तयार करत यशवंत युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून आदर्श पर्यटन निर्माण करून अकोले तालुक्याची नवीन ओळख तयार करण्याचा मानस फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित भांगरे यांनी रविवारी व्यक्त केला.
भांगरे घराण्यातील चौथी पिढी अमित भांगरे यांच्या रूपाने समाजकारण आणि राजकारणात उतरली आहे. ज्येष्ठ नेते आणि अमितचे वडील अशोक भांगरे यांनी आमदार यशवंतराव भांगरे यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी शेंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अमित याला अकोले तालुक्यातील आदिवासी जनतेच्या कामासाठी अर्पण करत असल्याचे जाहीर केले.
यावेळी अमित भांगरे म्हणाले, अकोले तालुक्याची पर्यटनातून वेगळी ओळख निर्माण व्हावी, यासाठी आपण आपल्या सहकाऱ्यांसमवेत यशवंत युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरुवातीला भंडारदरा परिसरातील दहा गावांचा आर्ट व्हिलेज म्हणून पर्यटन विकास करणार आहोत. याबरोबरच परिसरातील १२ गडकिल्ल्यांचा व पौराणिक महत्त्व असणाऱ्या ठिकाणांचा विकास करावयाचा आहे. जेणेकरून पर्यटनाला अधिक वाव मिळेल. गड, किल्ल्यांच्या परिसरात ट्रेकिंग व रॅपलिंगसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी सुशिक्षित बेरोजगार तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी मुंबई, पुणेसारख्या शहरी भागातून निष्णात शिक्षकांना आणून या युवकांना प्रशिक्षित करत त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
जैवविविधता संपन्न असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांत अनेक औषधी वनस्पती आहेत, त्यांचाही अभ्यास करून काय करावे लागेल, याचा विचार करणे, हिरडा, बेहडा, डिंक, मध अशा नैसर्गिक उत्पादित शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, आदीसाठी आराखडा तयार करणार असल्याचे सांगत अमित भांगरे यांनी आपले व्हिजन स्पष्ट केले.
....
भांगरे कुटुंबीयांची चौथी पिढी राजकारणात
साहेब, आमच्या दोन पिढ्यांनी तुमच्याबरोबर काम केले. मलाही आपणच मोठे केले. मी ३२ वर्षांपासून राजकारणात संघर्ष करत आहे. आता आमची चौथी पिढी निर्माण झाली. दोन वर्षांपूर्वी जनतेची मागणी होती अमितला समाजात काम पाहण्यास सांगावे. मात्र, त्यावेळी मीच त्याला थांबवले होते. आता साहेब... तुमच्या साक्षीने मी जाहीर करतो की, माझा अमित या अकोले तालुक्यातील आदिवासी जनतेच्या कामासाठी अर्पण करत असून, त्याने आपले काम सुरू करावे, असे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर केले.