भेंडा : गेल्या सहा महिन्यांपासून नेवासा तालुक्यातील उसाला दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश, हरियाना येथून रसवंतीसाठी मागणी आहे. सध्या ही मागणी निम्म्याने घटली असली तरी रोज ६० ते ७० टन ऊस पाठविला जातो. एप्रिलपासून रोज भेंडा परिसरातील सरासरी १५० टन ऊस उत्तरप्रदेशमधील मथुरा, आग्रा, दिल्ली, राजस्थान, हरियाना येथे ट्रकने जात आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी रक्कम मिळत असल्याने शेतकरी ऊस देतात. यासाठी स्थानिक दलाल उसाची पाहणी करून ऊस तोडून ट्रक भरून त्याचे वजन करणे, ऊस उत्पादकाला पैसे देणे हे नियोजन दलाल करतात. ऊस तोडणी कामगारांना प्रती टन ३०० रुपये व उसाचे वाढे मिळत असल्याने कामगार खुष आहेत.ट्रकचे भाडे ५० ते ६५ हजार इतके मिळते. रसवंतीसाठी पाठविल्या जाणाऱ्या उसाचा भाव २ हजार २५० वरून २ हजार ४५० रुपये प्रति टन इतका झाला आहे. रसवंतीसाठी शक्यतो आडसाली को. ८६०३२ या उसाची निवड करतात. ऊस चांगला स्वच्छ करून वजनानुसार १५ ते २० उसाची मोळी सुतळीने बांधतात. ट्रकमध्ये १६ ते २० टन ऊस भरला जातो. सध्या हे ट्रक उत्तर प्रदेशातील आग्रा व मथुरा येथे जातात. पूर्वीपेक्षा मागणी घटली असली तरी उसाचा भाव वाढला आहे. चार वर्षापासून रसवंतीसाठी उसाला चांगली मागणी आहे. (वार्ताहर)
नेवाशाच्या उसाची परराज्याला गोडी
By admin | Updated: September 28, 2014 23:27 IST