कर्जत : मामाकडून पैसे न मिळाल्यामुळे चिडलेल्या भाच्याने थेट मामाला अडकविण्याचा कट आखला अन् तक्रार देण्यासाठी कर्जत पोलीस ठाणे गाठले. मात्र, भाच्याचा हा बनाव मामीने उघडकीस आणला. मामाविरोधात रचलेले कुभांड आपल्याच अंगलट येत आहे, असे दिसताच भाच्याने धूम ठोकली. खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित भाच्यावरच कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सागर शंकर निंभोरे (रा. घोडेगाव, ता. श्रीगोंदा) असे बनाव करणाऱ्या भाच्याचे नाव असून, त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
श्रीगोंदा-कर्जत रोडवर दुरगाव फाटा येथे २ अज्ञात मोटार सायकलस्वारांनी सागर निंभोरे याला अडवून चाकूचा धाक दाखवून व मारहाण करून खिशातील १ लाख रुपये व मोबाइल चोरल्याची तक्रार सागर निंभोरे याने २७ मे रोजी कर्जत पोलिसात दिली होती. निंभोरे याने त्याचा मामा पोपट दरेकर यांनीच आपल्याला लुटले असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन खात्री करण्यास व आरोपींचा शोध घेण्यास कर्मचाऱ्यांना सांगितले.
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली पाहणी केली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने आणि पोलीस अंमलदार यांना या तक्रारीबाबत संशय आला. निंभोरे याची तक्रार घेऊन सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने यांना तपास करण्याबाबत सूचना दिल्या. पोलिसांनी गोपनीय माहिती मिळवली असता २७ मे रोजी निंभोरे आणि घोडेगाव येथील काही लोकांचा वाद झाला होता, असे समजले. त्यानंतर पोलिसांनी निंभोरे याला घोडेगाव (श्रीगोंदा) येथे नेले. निंभोरे याचे मामा पोपट दरेकर व त्यांचा मुलगा दीपक यांच्यासोबत निंभोरे याचा वाद झाल्याचे पोलिसांना समजले. निंभोरे यास घेऊन पोपट दरेकर यांच्या घरी पोलीस गेले असता त्याची मामी नंदाबाई पोपट दरेकर यांनी निंभोरे याचा भंडाफोड केला. निंभोरे याने पाेपट दरेकर यांचा मतिमंद मुलगा दीपक यास मारहाण केली. निंभोरे याचा मोबाइल दीपक दरेकर याने चोरल्याचा कांगावा करीत घराची झडती घेतली, असे सांगत नंदाबाई दरेकर यांनी दीपक दरेकर यास निंभोरे याने मारहाण केल्याची जखम दाखवली. आपला भंडाफोड झाल्याचे लक्षात येताच सागर निंभोरे याने तेथून धूम ठोकली.
शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस नाईक ईश्वर माने यांच्या तक्रारीवरून कर्जत पोलीस ठाण्यात सागर निंभोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल कण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर करत आहेत.
..........
वाटणीचे पैसे न दिल्याने वाद
निंभोरेचे मामा-मामी हे शेतीच्या वाट्याचे पैसे देत नाहीत म्हणून निंभोरे व त्यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे मामाला अडकविण्यासाठी निंभोरेने त्याचा मोबाइल मामाच्या घरात ठेवून तक्रार देण्यास पोलीस ठाणे गाठले होते. मात्र, पोलिसांच्या तपासात निंभोरे याचा भंडाफोड झाला अन् मामावर गुन्हा नोंदविण्यासाठी गेलेल्या भाच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला.