महिला उद्योजक होणे म्हणजे पुरुष करत असलेले व्यवसाय आपल्या ताब्यात घेणे असे नव्हे, तर महिलांनी स्वतःला सिद्ध करून व्यावसायिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला पाहिजे, असे मत संगमनेर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेश नेहा मणियार यांनी मांडले.
व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण गायकवाड, रासेयो अहमदनगर जिल्हा समन्वयक डॉ. प्रताप फलफले, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.ललिता मालुसरे, डॉ. सचिन कदम, प्रा.संदीप देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.
मणियार म्हणाल्या, ‘स्त्री व पुरुष समानता असावी. पैशामुळे परावलंबित्व वाढते म्हणून स्त्रियांनी व्यवसायात उतरुन स्वतःला सिद्ध करून आपले वेगळे स्थान निर्माण करावे. महिलांनी शिक्षण घेणे गरजेचे आहे; मात्र शिक्षणाचा संबंध लग्न, घरदार, संसार याच्याशी न जोडता स्त्रियांच्या प्रगतीशी जोडला जावा.’ सूत्रसंचालन रासेयो स्वयंसेवक निकीता चव्हाण यांनी केले. पाहुण्यांची ओळख गायत्री सोनुले यांनी करून दिली. अश्विनी काळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अक्षय शेळके, शुभम दराडे, प्रतीक पावडे, आबिद अत्तार, सौरभ गोडसे, विशाल राऊत यांनी परिश्रम घेतले.