काष्टी : श्रीगोंदा तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने शेतकरी सभासदांना एफआरपीप्रमाणे उर्वरित ५६१ रुपये उसाचे पेमेंट द्यावे, अशी मागणी नागवडे कारखाना माजी उपाध्यक्ष केशव मगर व जिजाबापू शिंदे यांनी केली आहे.
दीड वर्षापासून कोरोनासारख्या महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. जून महिना सुरू झाला असून, शेतीची कामे सुरू करणे, नवीन बियाणे घेणे, शेतीची मशागत करणे, घरातील खर्च, मुलांच्या फी, वह्या-पुस्तके यांचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न आहे.
नागवडे साखर कारखान्याने सन २०२०-२१ गाळप हंगामात २ हजार १०० रुपयांप्रमाणे पहिले बिल दिले. परंतु, आता कारखाना बंद होऊन तीन महिने झाले तरी दुसरा हप्ता नाही. कारखाना कामगारांना चार महिन्यांपासून पगार नाही. त्यांची उपासमार चालू आहे. नागवडे साखर कारखान्याने राहिलेले ५६१ रुपये ऊस बिल व ऊसतोडणी व वाहतूकदार यांचे १५ ते १६ कोटी रुपये देणे आहे. कारखान्याने यावर त्वरित कार्यवाही करणे आवश्यक आहे, असे आवाहन मगर, शिंदे यांनी केले आहे.
---
नागवडे साखर कारखाना ऊस बिल, कामगारांचे पगार आणि ऊस वाहतूकदारांचे राहिलेले पैसे बँकेचे कर्ज प्रकरण होताच ३० जूननंतर देणार आहे. कोरोना लाॅकडाऊनमुळे बँकेचे कामकाज पूर्ण क्षमतेने होत नव्हते. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. पुढील सर्व अडचणी सुटतील. कारखाना सर्व बाजूने सक्षम आहे. त्यामुळे कोणी चिंता करू नये.
-राजेंद्र नागवडे,
अध्यक्ष, नागवडे साखर कारखाना