अहमदनगर : दुष्काळ, पाणीटंचाई, महागाई या साऱ्या चिंता विघ्नहर्त्यावर सोडून गणरायांच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज झाले आहेत़ अबालवृध्दांचा लाडका बाप्पा येत्या शुक्रवारपासून (२९ आॅगस्ट)आपल्या घरी पाहुणा म्हणून येणार असल्याने सर्वांचीच लगबग सुरू झाली आहे़ प्रत्येकजण काहीना काहीतरी वेगळी सजावट करण्याच्या तयारीला लागला आहे़ दुष्काळाचे सावट आणि निवडणुकीच्या धामधुमीत गणरायांचे आगमन सर्व काही मंगल करून जाईल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे़ जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने बाजारपेठेतील आर्थिक व्यवहार थंडावले होते़ मात्र, गणेशोत्सव जसा जवळ येत आहे़ तशी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली आहे़ तर अनेकांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला आहे़ गणेशमूर्तीसाठी प्रसिध्द असलेले येथील गणपती कारखाण्यात तर गणेश मूर्तींना अखेरची रंगरंगोटी करून पॅकिंगचे काम सुरू झाले आहे़ येथील कारखान्यातील गणेश मूर्तींना, औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे़ उपनगरासह शहरातील माळीवाडा परिसर, चितळे रोड, गांधी मैदान, चौपाटी कारंजा, न्यायालय परिसर, दिल्ली गेट, कोठला, सावेडी उपनगर, बोल्हेगाव आदी ठिकाणी गणेश मंडळांची गणेशोत्सवाची पूर्व तयारी जोरात सुरू झाली आहे़ शेड उभारणीचे काम अंतीम टप्प्यांत आले असून, देखावे बनविण्यात कलाकार मग्न आहेत़ दहा दिवसांचा गणेशोत्सव शहरातील नागरिकांसह जिल्हावासियांसाठी एक पर्वणीच ठरते़ यावर्षी विविध गणेश मंडळांनी आकर्षक देखाव्यांचे नियोजन केले आहे़ यामध्ये सामाजिक, धार्मिक आणि प्रबोधनात्मक देखावे असणार आहेत़ हे देखावे पाहण्यासाठी दहा दिवस शहरात मोठी गर्दी होते़ मोठ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांसह गल्ली आणि सोसायटीतील बालगोपाळांचीही गणरायाच्या स्वागतासाठी धावपळ सुरू झालेली दिसत आहे़ (प्रतिनिधी)
बाप्पाच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज
By admin | Updated: August 21, 2014 23:06 IST