योगेश गुंड , नगर तालुकायेत्या दोन महिन्यात होत असलेल्या नगर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आता तालुक्यातील राजकारण तापत असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्यात मोर्चे बांधणीला वेग आला आहे. आ.शिवाजी कर्डिले यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी दादा पाटील शेळके यांना पुन्हा कुरुक्षेत्रात उतरवले जात असून त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय (भाजप सोडून) महाआघाडी स्थापन करण्यासाठी तालुक्यात राजकीय हालचाली वेगवान झाल्याने २० जुलै रोजी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या नगर बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत सप्टेंबरमध्ये संपत आहे. यामुळे एक-दोन महिन्यात नगर बाजार समितीचे बिगुल वाजणार आहे. सध्या समितीवर आ.कर्डिले व माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाची एकहाती सत्ता आहे. तालुक्याचे ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके यांनी बाजार समितीचा कायापालट केला, त्यानंतर आ.कर्डिले यांनी शेतकरी भवन, नेप्ती बाजार समिती निर्माण करून शेळके यांच्या कार्याला शह दिला. मागील वेळी कर्डिले-कोतकर यांच्या विरोधात शिवसेना, दादा पाटील तसेच राष्ट्रवादीने मोठे आव्हान उभे करूनही या सर्वपक्षीय आघाडीचे तालुक्यात पानिपत झाले. मात्र निवडणुकीच्या तोंडावर कोतकर यांना खून प्रकरणात अटक झाली. यानंतर बाजार समितीच्या कारभाराला उतरती कळा आली. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करणे ही बाजार समितीला मुश्कील झाले. बाजार समितीकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्याने हजारो शेतकऱ्यांची कामधेनू असणारी ही समिती राजकारणाचा व संचालकांना चरण्याचा अड्डा बनली.दरम्यान, आता बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मागील वेळी सत्ताधारी म्हणजे कर्डिले-कोतकर यांच्या विरोधात सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी असो राज्यातील अनोखी राजकीय आघाडी घडून आली. त्यास अपयश आले. आता यावेळीही पुन्हा अशा आघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली असून आता कर्डिले यांच्यासोबत निवडणुकीचे सर्व सूत्र हलवणारे कोतकर नसल्याने कर्डिले एकाकी आहेत. याच संधीचा फायदा घेण्यासाठी कर्डिले यांचे विरोधक दादा पाटील शेळके यांना तालुक्याच्या महाभारतासाठी कुरुक्षेत्रावर पाठवण्याचा डाव खेळत आहेत. यात शिवसेना कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आघाडीवर असल्याने पुन्हा मागील प्रमाणे कर्डिले विरोधकांना एकत्र करून त्यांच्या राजकीय वर्चस्वाला शह देण्याचा यामागे हेतू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यासाठी शेळके यांनी २० जुलै रोजी त्यांच्या कार्यालयात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. कर्डिले यांच्याविरोधात बाजार समितीची निवडणूक लढवण्यासाठी चर्चा करून निर्णय घेण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना धाडले आहे. सत्ताधारी विरोधात परिवर्तन मंडळ स्थापन करण्यावर यात शिक्कामोर्तब होणार आहे.
नगर तालुका बाजार समिती, जिल्हा परिषदेसाठी हालचाली
By admin | Updated: July 13, 2016 00:31 IST