अहमदनगर : महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपच्या वतीने बैठक घेण्यात आली होती. मात्र या बैठकीतही एकमत झाले नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय लांबणीवर पडला आहे. दरम्यान, महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी जोरदार हालचाली सुरू असून, या पदासाठी सेना व काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर भाजपने दावा केला आहे. भाजपकडून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर जबाबदारी साेपविण्यात आली आहे. त्यांनी भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांची नुकतीच बैठक घेतली. विरोधी पक्षनेते पदासाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी सभापती मनोज कोतकर आणि नगरसेवक महेंद्र गंधे हे इच्छुक आहेत. या तिघांशीही कर्डिले यांनी स्वतंत्र चर्चा केली. मात्र अंतिम निर्णय जाहीर केला नाही. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले. महिला व बालकल्याण समितीच्या १६ सदस्यांचीही सर्वसाधारण सभेत नेमणूक करण्यात आली आहे. सभापती पदासाठी काँग्रेसकडून रूपाली वारे व संध्या पवार यांची नावे चर्चेत होती. परंतु, गटनेत्या सुप्रिया जाधव यांनी महिला व बालकल्याण समितीसाठी स्वत:चेच नावे दिले. महिला व बालकल्याण समिती काँग्रेसला देणार असल्याचे बोलले जात होते. परंतु, हे पद सेनेलाही हवे आहे. त्यामुळे उपसभापती पद काँग्रेसला दिले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास काँग्रेसला उपसभापती पदावर समाधान मानावे लागणार आहे. विरोधी पक्षनेते व महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींची निवड झाल्यानंतर सभागृहनेते बदलले जाणार आहेत.
.....