अहमदनगर : शहरात विविध विकास योजना राबविण्यासाठी शासनाने निधी दिला आहे. मात्र त्यात हिस्सा भरण्यासाठी महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही. योजनांचा हिस्सा भरण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने ५४ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करावी अशी मागणी महापौर संग्राम जगताप यांनी पालकमंत्री मधुकर पिचड यांच्याकडे केली आहे. मुळा धरणावरील पाणी पुरवठा योजनेसाठी ३३ केव्ही नवीन विद्युत वाहिनी टाकण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महावितरण कंपनीने ५कोटी ९४ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. पिंपळगाव माळवी तलावातील गाळ काढून तलाव पुर्न:जिवीत करण्यासाठी महापालिकेला २ कोटी ५ लाख खर्च लागणार आहे. कोपरगाव-नगर रस्ता चौपदरीकरणामध्ये अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेची बाधीत होत असलेली पाईपलाईन स्थलांतर करण्याऐवजी नव्याने टाकण्याचा प्रस्ताव जगताप यांनी मांडला. त्यासाठी २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्याची तरतूद जिल्हा नियोजन समितीत करावी अशी मागणी जगताप यांनी केली. नगर शहरात भुयारी गटार योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाने २६६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा निधी लवकरच महापालिकेकडे वर्ग होईल. त्यात महापालिकेला दहा टक्के प्रमाणे २६ कोटी रुपयांचा हिस्सा भरावयाचा आहे. तथापी महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता ही रक्कम भरणे अशक्य आहे. शहरात या विकासाच्या योजना पूर्ण झाल्या तर शहराची समस्या सुटणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती हलाख्याची असल्याने जिल्हा नियोजन समितीकडून ५४ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी महापौर संग्राम जगताप यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेला हवेत ५५ कोटी!
By admin | Updated: June 1, 2014 00:23 IST