रूईछत्तीसी : मागील आठवड्यात पडणाऱ्या रिमझिम पावसाने रूईछत्तीसी (ता. नगर) मुगाला जीवदान मिळाले. मात्र खरीप हंगामातील तूर, सोयाबीन, उडीद या पिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
रोहिणी नक्षत्रात झालेल्या समाधानकारक पावसाने रूईछत्तीसी परिसरात खरीप पिके चांगली जोमाने आली आहेत. मूग, सोयाबीन, तूर, बाजरी अशा पिकांची पेरणी करण्यात आली. मागील वर्षी मकाचे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात घेण्यात आले होते. परंतु, त्यावर पडणारा रोग आणि फवारणीसाठी येणारा खर्च विचारात घेता शेतकऱ्यांना मका पीक परवडत नाही. त्यामुळे यंदा मकाचे उत्पन्न घटले आहे. शेतकऱ्यांनी यंदा मूग, उडीद व तूर या पिकांवर भर दिला आहे.
मूग ऐन जोमात असताना पावसाने दडी मारली होती. मात्र नंतर थोडाफार झालेल्या पावसाने दिलासा दिल्याने मुगाच्या पिकाला जीवदान मिळाले. मागील वर्षीही शेतकऱ्यांना मुगाचे विक्रमी उत्पन्न मिळाले होते. यंदाही बऱ्यापैकी उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. आता पुन्हा शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. झालेल्या पावसावर आता मुगाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येणार आहे.
---
तूर, उडीद, सोयाबीन या पिकांना पावसाची गरज भासू लागली आहे. या पिकांना जास्त दिवस लागत असल्याने पावसाची जास्त गरज असते. पाऊस येणे फार गरजेचे आहे. पाऊस आला नाही तर ही पिके मातीमोल होणार आहेत.
यंदा पाऊस मागील वर्षीपेक्षा कमीच आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवन पावसावर अवलंबून असल्याने संपूर्ण पिकांसाठी पाऊस येणे गरजेचे आहे.
-मारूती जगदाळे,
शेतकरी, रूईछत्तीसी
----
दरवर्षीपेक्षा यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याचे जाणवते. परंतु, शेतकऱ्यांची कोरोनाच्या काळात खूप आर्थिक अडचण झाल्याने खरीप पिकाचे उत्पन्न शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावणार आहे. त्यासाठी पाऊस येणे गरजेचे आहे.
-संतोष साके,
कृषी सहायक, रूईछत्तीसी
----
२४ रूईछत्तीसी मूग
पावसाच्या लंपडाव नंतरही रूईछत्तीसी परिसरात बहरलेला मूग.