अहमदनगर : पेट्रोल पंपावरील रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी घेऊन जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धूमस्टाईलने हाताला हिसका मारून ४ लाख ८४ हजार ५६० रुपयांची रक्कम असलेली बॅग पळविली़ शहरातील स्वस्तिक चौकात गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ घटनेनंतर पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले़ मात्र, रक्कम पळविलेला मुख्य आरोपी अद्याप फरारच आहे़ शहरातील पंजाब पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी सोमनाथ साहेबराव कोतकर हे सकाळी पेट्रोल, डिझेल विक्रीतून जमा झालेली ४ लाख ८४ हजार ५६० रुपयांची रक्कम भरणा करण्यासाठी मर्चंट बँकेत दुचाकीवरून जात होते़ स्वस्तिक चौकात आल्यानंतर वाहनांची गर्दी झाल्याने कोतकर यांच्या दुचाकीचा वेग कमी झाला़ याचवेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोतकर यांच्या हाताला हिसका मारून पैशाची बॅग घेऊन पोबारा केला़ दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी चेहऱ्यांना रुमाल बांधलेला होता़ कोतकर यांनी त्यांचा पाठलाग केला मात्र ते सक्कर चौकामार्गे भरधाव वेगाने निघून गेले़ या घटनेनंतर कोतकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेत अरणगाव येथून अरुण बाबासाहेब घुगे तर शहरातून शेख शाहरूक रहिम उर्फ दाऊद याला ताब्यात घेतले़ या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली़ चोरलेली रक्कम मात्र, तिसराच आरोपी घेऊन गेला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़ (प्रतिनिधी)
धूमस्टाईलने पाच लाखांची रोकड लांबविली
By admin | Updated: October 15, 2016 00:52 IST