अहमदनगर : शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ तीन महिन्यात नियुक्त करण्याचे शपथपत्र राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दिले आहे. ही मुदत गुरुवारी संपली. न्यायालयाच्या अवमानाची कारवाई होण्याची भीती असल्याने विश्वस्त मंडळ नियुक्तीच्या हालचाली सुरु असल्याचे सरकारमधील सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ २०१२ मध्ये एका जनहित याचिकेमुळे राज्य सरकारने बरखास्त केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समिती सध्या संस्थानचा कारभार पाहत आहे. यामध्ये जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे. या त्रिसदस्यीय समितीवर निर्णय घेताना बंधने असल्याने अनेक निर्णय अडून पडले आहेत. साईबाबांच्या महासमाधी शताब्दी महोत्सवाची विविध कामे करण्यासाठी प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्यासाठी संस्थानने न्यायालयात परवानगी मागितली आहे. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी तीन महिन्यात व्यवस्थापन समिती नियुक्त करण्याची प्रक्रिया केली जाईल, असे शासनाकडून १४ जानेवारी रोजी न्यायालयात सांगण्यात आले होते. ही मुदत संपली आहे. या आठवड्यात सरकारने नियुक्त्या न केल्यास न्यायालयाकडून सरकारवर ताशेरे ओढले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता हा धोरणात्मक निर्णय असल्याने याबाबत मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरच निर्णय होईल असे सांगण्यात आले. यापूर्वी २००४ ते २०१२ अशी सलग नऊ वर्षे माजी आमदार व विखे समर्थक जयंत ससाणे हे या संस्थानचे अध्यक्ष होते. २०१२ साली तत्कालीन काँग्रेस सरकारने विश्वस्त मंडळात राजकारण्यांचाच भरणा केल्याने या नियुक्त्यांना आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे नियुक्त्या रद्द कराव्या लागल्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाच्या नियुक्त्या करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ........................ कदम, कोल्हे यांची नावे चर्चेत जिल्'ातील भाजपचे माजी आमदार व संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते चंद्रशेखर कदम यांचे नाव संस्थानच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. याशिवाय आमदार स्रेहलता कोल्हे यांचेही नाव चर्चेत आहे. अनेक इच्छुकांनी आपली वर्णी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्याचे समजते. ................ विखे यांचेही निवडीकडे लक्ष शिर्डी संस्थान हे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात येते. त्यामुळे संस्थानवर कोणाची निवड होते, याकडे विखे यांचेही विशेष लक्ष आहे. संस्थानवरील नियुक्त्या लांबणे हे विखे यांच्यासाठी सोयीचे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
शिर्डीचे विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याच्या हालचाली
By admin | Updated: April 15, 2016 00:33 IST