कोठे बु्द्रुक येथील रंगनाथ सावळेराम भालके (वय ४५) यांच्या घरासमोर लावलेली ५० हजार रुपयांची दुचाकी (क्र. एम.एच. ५,डी.५९९४) शुक्रवारी (दि. २२) रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान एका चोरट्याने लंपास केली. भालके हे घरात जेवण करत असताना दुचाकीची चोरी होत असल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केला असता आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेतली. ही दुचाकी कोठे बुद्रुक येथील रॉकी भाऊसाहेब जाधव याने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ग्रामस्थांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला मात्र, तो पसार झाला. याच गावातील वसंत गंगाराम वाकळे यांचीही दुचाकी चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलीस हेडकाॅन्सटेबल सुरेश टकले हे करत आहेत.
शेळकेवाडी-घारगाव रस्त्यालगत उमेश खोंड यांच्या घरासमोर शेडमध्ये लावलेली मोटारसायकल क्रमांक एमएच (१७ सी. एच. १७६४) चोरट्यांनी लंपास केली. ही घटना गुरुवारी (दि.२१) रोजी घडली. सुमारे साठ हजार रुपये किमतीची ही दुचाकी होती. याप्रकरणी उमेश खोंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकाॅन्सटेबल राजू खेडकर हे करत आहे.
जवळेबाळेश्वर येथील शाम सैलू घोडे यांची दुचाकी (क्रमांक एमएच १७ सी.डी ०२१५) संतोष गणपत खराटे यांच्या पोल्ट्री फार्मजवळून चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि.१३) पहाटे घडली. चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी होती. याप्रकरणी शाम घोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल आदिनाथ गांधले हे करत आहे.
माळेगाव पठार येथून रामभाऊ बाळशिराम भोर यांचीही दुचाकी (क्र.एम.एच १७ .बीजी .२१४९) चोरट्यांनी दोन ते तीन दिवसांपूर्वी पहाटेच्या वेळी चोरट्यांनी लंपास केली. भोर यांनीही दुचाकीचा सगळीकडे शोध घेतला मात्र ती कुठेच मिळून आली नाही. त्यांनी अद्यापपर्यंत फिर्याद दाखल केली नाही.
...
महिन्यात पाच दुचाकींची चोरी
दरम्यान, महिन्याभरात चोरट्यांनी घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे पाच दुचाकी चोरून नेल्या आहेत. घारगाव पोलिसांनी दुचाकी चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी दुचाकीस्वारांनी केली आहे. या दुचाकींची चोरटे मुंबई, पुणे येथे नेऊन विक्री करत आहेत.