तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे मुलाच्या पाठोपाठ आईचाही मृत्यू होण्याची हृदयद्रावक घटना घडली. दोघांच्याही स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी वृक्षारोपण करीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
तळेगाव दिघे (जुनेगाव) येथील सामाजिक वनीकरण खात्यातून सेवानिवृत्त झालेले छबुराव आप्पाजी दिघे (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर दोन दिवसातच त्यांची आई गंगुबाई आप्पाजी दिघे (वय ८१) यांचेही निधन झाले. मुलाच्या पाठोपाठ आईचाही मृत्यू होण्याची हृदयद्रावक घटना घडल्याने या कुटुंबासह परिसरावर शोककळा पसरली. दिघे कुटुंबीयांनी दोघांच्याही स्मरणार्थ वृक्षारोपण करीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. याप्रसंगी अनिल दिघे, गोरख दिघे, शिवाजी दिघे, राजेंद्र दिघे, रवींद्र दिघे, दत्ता दिघे, बन्सीभाऊ आभाळे, संतोष दिघे उपस्थित होते.