पूजा सागर मोहिते (वय २१, रा. साेनेमळा, जांबूत बुद्रुक, ता. संगमनेर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सागर रघुनाथ मोहिते (पती), रघुनाथ नामदेव मोहिते (सासरा), सुवर्णा रघुनाथ मोहिते (सासू), पूजा रघुनाथ माेहिते (सर्व रा. सोनेमळा, जांबूत बुद्रुक, ता. संगमनेर), बबन दौलत पवार (मामेसासरा, रा. शाहुनगर, अकोले) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याविरोधात मयत पूजा मोहिते यांचे वडील विष्णू नामदेव कर्णिक (कारखाना रस्ता, अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पूजा मोहिते सासरी नांदत असताना माहेरहून सोने आणि पैसे आणण्यासाठी त्यांचा वरील गुन्हा दाखल झालेल्या मंडळींकडून छळ सुरू होता. त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करून उपाशी ठेवले. त्यामुळे कंटाळून त्यांनी विषारी द्रव्य सेवन केल्यानंतर संगमनेरातील व त्यानंतर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले होते. पूजाचा पती सागर आणि सासरा रघुनाथ या दोघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मामे सासरा पवार याला अटक करत गुरुवारी (दि. १२) न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, गुन्हा दाखल झालेल्या सर्वांना अटक करावी, या मागणीसाठी मयत पूजा सागर मोहिते यांच्या माहेरकडील मंडळींनी आक्रमक होऊन पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घोषणाबाजी केली. दुपारी चारपर्यंत ते पोलीस ठाण्याबाहेरच बसलेले होते. सर्व आरोपींना अटक झाल्याशिवाय आम्ही येथून उठणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती.
-------------