अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोमवारी तब्बल ८५७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३ हजार ८९७
इतकी झाली आहे. सोमवारी ४७५ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
जिल्ह्यात सोमवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३१९, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४७५ आणि अँटिजेन चाचणीत ६३ रुग्ण बाधित आढळले. जिल्ह्यात आज ४७५ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८० हजार ३६९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.०५ टक्के इतके झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असल्याचे यंत्रणेने सांगितले. त्यामुळे बहुतांश रुग्ण घरी विलगीकरणात किंवा खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
-----------
सोमवारचे पॉझिटिव्ह रुग्ण
नगर शहर-२९१, राहाता-१११, संगमनेर-८४, कोपरगाव-७६, श्रीरामपूर-५२, जामखेड-३७, नगर ग्रामीण- ३४, नेवासा-२७, राहुरी-२६, पारनेर- २१, पाथर्डी -१९, कर्जत-१८, शेवगाव-१५, कंटोनमेंट बोर्ड-१५, अकोले -१४, परजिल्हा-११, श्रीगोंदा-६ (एकूण-८५७).
-----------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्ण संख्या : ८०३६९
उपचार सुरू असलेले रुग्ण : ३८९७
मृत्यू : ११८९
एकूण रुग्ण संख्या : ८५४५५
----------
जिल्हा रुग्णालयातील सामान्य उपचार बंद होणार
जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात दोनशे बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर शंभरपेक्षा जास्त रुग्ण संशयित आहेत. जिल्हा रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचार देण्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. किमान चारशे रुग्णांवर उपचार करता येतील, यासाठी जिल्हा रुग्णालयात आता यापुढे नॉन कोविड रुग्णांवर उपचार बंद होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.