श्रीगोंदा : शरद पवारांच्या स्वाभिमानी नेतृत्वाखाली महाराष्ट्र गुजरात पेक्षा आघाडीवर आहे. भाजपावाल्यांनी खोटी जाहिरातबाजी करून महाराष्ट्राची बदनामे केली आहे. मोदींनी भाषणबाजी करण्यापेक्षा कळसूबाई शिखरावरून महाराष्ट्राच्या विकासाचे दर्शन घ्यावे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यानी मारला आहे.राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांच्या प्रचारार्थ बेलवंडीयेथे आयोजित सभेस भुजबळांनी आपल्या शैलीत भाजपावर चौफेर हल्ला चढविला. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे होते.भुजबळ पुढे म्हणाले की शरद पवारांनी देशातील शेतकऱ्यांचे ७० हजार कोटीचे कर्ज माफ केले. मात्र ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदी सरकारने कांदा निर्यातबंद केली. डाळिंबाचे भाव कमी केले. दूध व्यवसायाची वाट लावली.कै. गोपीनाथ मुंडें मुळे भाजपाला बहुजनाचा चेहरा होता, गडकरी, फडणवीस, जावडेकर, गोयल यांच्यामुळे भाजपाचा शेठजी भटजीचा चेहरा पुढे आला. शाहू, फुले, आंबेडकरांच्या मातीतून जातीवादी प्रवृत्तीला मूठमाती देण्याची गरज आहे.गुजरातला महाराष्ट्राने सयाजीराव गायकवाड सारखा राजा दिला. त्यामुळे मोदीच्या विचाराची गरज नसून शरद पवार हे महाराष्ट्राचे समर्थ नेते आहेत. मुंबई मोरारजी देसाईच्या घशातून एकदा काढली आहे, पुन्हा मोदीकडे देण्याची चूक महाराष्ट्रातील जनता करणार नाही. यावेळी कमल सावंत, प्रा. तुकाराम दरेकर, हरिदास शिर्के, भरत नहाटा, अनिल ठवाळ यांची भाषणे झाली. यावेळी प्रकाश शेंडगे, शिवाजीराव नागवडे, राजेंद्र नागवडे, कैलास पाचपुते, संध्या जगताप, मंगला कौठाळे, गयाबाई सुपेकर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
मोदींनी कळसूबाई शिखरावरून महाराष्ट्र दर्शन घ्यावे
By admin | Updated: October 7, 2014 23:50 IST