श्रीरामपूर : शहरातील एका सराईत मोबाईल चोराचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला; मात्र मृत्यूची ही घटना लपविण्यात आली. शहर पोलिसांनी चोराच्या साथीदारांची उलटतपासणी घेतल्यानंतर घडलेला प्रकार समोर आला.
मयताचे नाव मुजाहिद मस्तान शेख (वय २०, फकिरवाडा) असे आहे. रविवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. मयत मुजाहिद याच्या साथीदारांची शहर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याच्या मृत्यूच्या घटनेमागील कारणाचा उलगडा झाला.
शनिवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान मुजाहिद हा त्याचे साथीदार जुबेर हरुण शेख, इरफान मैनुद्दीन सय्यद, अरबाज जब्बार शहा (रा. सर्व श्रीरामपूर) यांच्यासह रेल्वेस्थानकावर मोबाईल चोरीच्या उद्देशाने पोहोचले. यावेळी नगरहून येणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेस गाडीमध्ये मुजाहिद मोबाईल चोरण्याच्या उद्देशाने घुसला; मात्र प्रवाशांनी आरडाओरड केल्याने त्याच दरवाजातून मुजाहिद याने बाहेर उडी मारली. त्यावेळी मनमाडहून नगरकडे जाणाऱ्या हबिबगंज एक्स्प्रेसची त्याला जोराची धडक बसली. या घटनेत मुजाहिद गंभीर जखमी झाला. त्याच्या अन्य साथीदारांनी अरबाज शेख नावाच्या व्यक्तीला घटनास्थळी रिक्षा घेऊन बोलावले. मुजाहिद याचे कुटुंबीय देखील दाखल झाले. त्यांनी मुजाहिद याला शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कुटुंबीयांनी मुजाहिद याचा मृतदेह त्यानंतर फकिरवाडा येथील घरी नेला. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी घरी येऊन चौकशी सुरू केली. मुजाहिद याच्या साथीदारांचा शोध घेण्यात आला. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच घटनेची उकल झाली. पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा तपास करण्यात आला.