अहमदनगर : मल्हार चौकात मनसेच्या कार्यकर्त्याला सोमवारी रात्री लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी एका माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.रेल्वे स्टेशन परिसरातील मल्हार चौकात सोमवारी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान हाणामारीचा प्रकार घडला. मनसेचे कार्यकर्ते निलेश पंडित सुपेकर (रा.भोसले आखाडा, बुरुडगाव रोड) मल्हार चौकात आला असता,‘ तू चौकात का आला?अशी विचारणा करीत चौघांनी त्याला बेदम मारहाण केली. माजी नगरसेवक दीपक साहेबराव खैरे, सतीश साहेबराव खैरे, साहेबराव बबनराव खैरे, भैय्या अशोक कांबळे या चौघांनी सुपेकर यांना मारहाण केली. यामध्ये ते जबर जखमी झाले. या प्रकरणी सुपेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. दरम्यान दीपक खैरे यांच्या नातेवाईकांनीही विरोधी फिर्याद दिली आहे. या हाणामारीच्या प्रकाराने रेल्वे स्टेशन परिसरात सोमवारी रात्री बराचवेळ तणाव होता. (प्रतिनिधी)
मनसे कार्यकर्त्याला मारहाण
By admin | Updated: September 23, 2014 23:03 IST