कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची चांगलीच रणधुमाळी सुरू आहे. त्यातच आमदार आशुतोष काळे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने निवडणुकीच्या गावागावात जाऊन ते बैठका घेत आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे, तर कोल्हे गटाची सर्व सूत्र युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हाती आहेत. त्यामुळे त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर सर्वाधिकार देऊन काही अडचण असल्यास थेट संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत, तसेच जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी त्यांच्याच संवत्सर ग्रामपंचायतीच्या निवणुकीत लक्ष केंद्रित केले आहे.
कोपरगावात सुरू असलेल्या निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा (बुधवार, दि. १३) सायंकाळी ५ वाजता थंडावणार आहेत. मात्र, या प्रचारात गेले ९ दिवस तालुक्यातील मातब्बर नेत्यांची गावागावातील उमेदवारांच्या प्रचारासाठी चांगलीच धावपळ झाली आहे. गत आमदारकीच्या निवडणुकीनंतर तालुक्यातील ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील निवडणूक ही आमदार आशुतोष काळे यांनीच प्रतिष्ठेची केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आजवरच्या ग्रामपंचायत स्तरावरील निवडणुकीत एकाही आमदाराने गाव पातळीवर प्रचार केल्याचे ऐकिवात नाही. परंतु, आमदार काळे यांनी या निवडणुकीत काही गावात दोन-दोन वेळा भेटी दिल्या, बैठका घेतल्या आहेत. एका गावात तर १६५ मतदार असलेल्या भागात आमदार काळे यांनी दोनदा भेट दिली असल्याची तालुक्यात चर्चा आहे. तसेच उमेदवारांच्या प्रचारासाठी असणाऱ्या गाड्यांच्या भोंग्यातून थेट काळेंच्या प्रादेशिक पक्षाची ध्वनीफीत वाजविण्यात येत आहे. दरम्यान, या निवडणुकीतही सर्वाधिकार त्यांच्याचकडे असल्याने कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत आहेत. ही निवडणूक नेमकी ग्रामपंचायतीची आहे की आमदारकीची? यात मतदार राजाही गोंधळलेल्या अवस्थेत आहे.
तालुक्यातील दुसरे मातब्बर नेते, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिंरजीव, युवा नेते विवेक कोल्हे यांनी मात्र कार्यकर्त्यांना या स्थानिक पातळीवरील लढाईत सर्वतोपरी मदत करून ही लढाई स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनीच जिंकावी, असे प्रोत्साहीत करून त्यांना स्वातंत्र्य दिले आहे. या निवडणूक प्रक्रियेत गावपातळीवर कोणतीही मदत लागल्यास तत्काळ संपर्क साधा. समस्या सोडविण्यात येईल, असे आश्वस्त केले आहे. त्यामुळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. तसेच स्थानिक पातळीवरील निवडणुकीच्या प्रचारात कोल्हे यांनी हस्तक्षेप न केल्याने निवडणुकीत आपला दर्जा कायम राखला असल्याची तालुक्यात चर्चा आहे. मात्र, राजेश परजणे यांनी संवत्सर ग्रामपंचायतीमध्ये स्वत: लक्ष घातले आहे, तर काळे - कोल्हे यांनी आपापले पॅनल लावले आहेत. त्यामुळे येथे तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे राजेश परजणे यांना गावातच लक्ष घालावे लागले आहे.
........
या ग्रामपंचायतींची होत आहे निवडणूक...
सवंत्सर, सांगवी भुसार, उक्कडगाव, तिळवणी, घारी, रवंदे, ओगदी, अंचलगाव, सोनारी, हिंगणी, वेळापूर, देर्डे चांदवड, येसगाव, मढी बुद्रुक, मढी खुर्द, आपेगाव, नाटेगाव, कोळगाव थडी, मळेगाव थडी, मायगाव देवी, मनेगाव, काकडी, जेऊर कुंभारी, धोंडेवाडी, अंजनापूर, कोकमठाण, कासली, टाकळी, जेऊर पाटोदा.