अहमदनगर : नगर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांत आर्थिक घोटाळा व अनियमितताप्रकरणी चौकशीत जबाबदारी निश्चत केल्याने आकसापोटी नगरचे एसटीचे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी आपली तक्रार केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप यांनी नाशिक माहिती आयुक्तांकडे केली आहे.
घोलप यांनी तक्रारीत म्हटले आहे की, एसटीच्या नगर विभागीय कार्यालयात विभाग नियंत्रक विजय गिते यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना अनियमितता केली. याबाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. शिवाय याप्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्नही उपस्थित झाला होता. याची दखल घेत एसटीच्या वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी नगरमध्ये येत गिते यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची चौकशी केली. तसेच गैरप्रकाराच्या अनुषंगाने जाबजबाब घेतले. यात चौकशी अधिकाऱ्यांनी गिते यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे, असे असतानाही गिते यांनी आपली तक्रार माहिती आयुक्तांकडे करून आपण विनाकारण माहिती मागवून त्रास देत असल्याचे म्हटले आहे. मुळात या प्रकरणात आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे गिते अडचणीत आले असल्याने त्यांनी आकसापोटी ही तक्रार केली. त्यामुळे आपण तक्रारीची शहानिशा करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी घोलप यांनी केली आहे.
----------
पाचजणांविरोधात जनहित याचिका
नगरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांत झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी एसटीच्या वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी नगरमध्ये येत गिते यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यात चार ते पाचजणांवर जबाबदारी निश्चित करून आपला अहवाल फेब्रवारी २०२१ मध्ये मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांना पाठवला आहे. परंतु तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप काहीच कारवाई न झाल्याने अमोल घोलप यांनी नुकतीच औरंगाबाद खंडपिठात गिते यांच्यासह पाचजणांविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे.
------------
आपण माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीमुळे व पाठपुराव्यामुळे नगर विभागीय कार्यालयातील एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांतील अनियमितता चव्हाट्यावर आली. त्याच्या आकसापोटी विभाग नियंत्रकांनी आपण वारंवार माहिती विचारून त्रास देतो, अशी तक्रार माहिती आयुक्तांकडे केली. परंतु त्यात तथ्य नाही. एखाद्या माहितीबद्दल समाधान झाले नाही तर पुन्हा माहिती मागवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.
- अमोल घोलप, सामाजिक कार्यकर्ते