संगमनेर : महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना शासन आदेश, शासकीय नियमावली, कार्यालयीन शिष्टाचार, महाराष्ट्र सेवा शास्ती वर्तणूक अधिनियमातील तरतुदी, सेवा हमी कायदा, माहिती अधिकार कायदा, कार्यालयीन कार्यपद्धती याबाबत समज द्यावी. तसेच संबंधित तक्रारींबाबत आपण लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर कांदळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सोमवारी (दि. ३०) महसूलमंत्री थोरात यांना कांदळकर यांनी निवेदन दिले आहे. वरील विषयानुसार फेब्रुवारी महिन्यात निवेदन दिले होते. त्यानंतर महसूल विभागाचे विशेष कार्य अधिकारी महेश शेवाळे यांचे मला पत्र प्राप्त झाले होते. परंतु त्यानंतर माझ्या मागणी संदर्भाने आतापर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. अनेकदा तोंडी तसेच पत्रव्यवहार करूनही कोणी काहीही उत्तर देत नाही. त्याकडे संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. हीच बाब आपण पाठविलेल्या पत्रावर झाली असून लोकप्रतिनिधी यांच्या पत्रावर वेळेत कार्यवाही न करण्याचे धाडस जर मंत्रालयीन अधिकारी करत असतील तर सामान्य जनतेच्या कामावर तसेच तक्रारींवर कार्यवाही होते का? हा मोठा प्रश्न आहे. याबाबत आपण सखोल चौकशी करुन दोषींवर शासन नियमाप्रमाणे कारवाईचे आदेश द्यावेत. जेणे करुन महाराष्ट्र शासनाची प्रतिमा मलीन करणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य शासन होईल, असे कांदळकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
-----------------