लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : पाऊस वेळेवर पडला तरी कोरोनाच्या महामारीमुळे यंदाचा खरीप हंगाम लांबण्याची शक्यता आहे. मे महिना अर्धा संपत आला असून, खरिपासाठी उपलब्ध झालेले लाखो मेट्रिक टन खत व बियाणे अजून कुलूप बंद आहे. प्रशासकीय पातळीवरही दुकाने सुरू करण्याबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. त्यामुळे लसीकरणाप्रमाणेच ऐनवेळी जून महिन्यांत बियाणे व खतांसाठी कृषी सेवा केंद्रांबाहेर रांगा तर लावाव्या लागणार नाहीत ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
यंदा वेळेवर पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे कृषी विभागाने खरिपाची तयारी केली आहे. मागील वर्षीचे १ लाख मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. नव्याने २८ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. पेरणीसाठी एक लाख क्विंटलहून अधिक बियाणेही उपलब्ध झाले आहे. असे असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू केले गेले आहेत. सरकारने लॉकडाऊनमधून शेती क्षेत्राला सूट दिली होती. मात्र, ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन स्थानिक प्रशासनाने कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे इतर दुकानांप्रमाणे नगर शहरासह ग्रामीण भागातील ४ हजार ४०० कृषी सेवा केंद्र बंद आहेत. यापैकी खत व बियाण्यांचे ठोक विक्रेते ६०० आहेत. त्यांच्याकडून लहान- मोठ्या कृषी सेवा केंद्रांना खत व बियाणे पोहोच होत असते. परंतु, ठोक विक्रेत्यांचीच दुकाने सध्या बंद असल्याने बियाणे दुकानांना पोहोच झाले नाही.
साधारणपणे मे महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात खते व बियाण्यांची खरेदी सुरू होते. यंदा मात्र मे महिना संपत आला तरी बियाण्याचा एक दाणाही शेतकऱ्यांना खरेदी करता आलेला नाही. पुढील किमान १५ दिवसांत तरी याबबत निर्णय व्हावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून पुढे येत आहे.
.........
जिल्ह्यातील खरिपाचे एकूण क्षेत्र
६,८५,००० हेक्टर
....
खतांची पूर्तता अशी
कृषी विभागाची मागणी- २ लाख ५५ हजार मेट्रिक टन
मंजूर आवंटन- २ लाख २२ हजार १५० मेट्रिक टन
मागील वर्षीचे शिल्लक- १ लाख मेट्रिक टन
चालू वर्षी उपलब्ध झालेले- २८ हजार मेट्रिक टन
......
बियाणे
कृषी विभागाची मागणी- ५ लाख २५ हजार क्विंटल
उपलब्ध बियाणे- १ लाख ३० हजार क्विंटल
.....
कृषी सेवा केंद्र
४४००
...
ठोक विक्रेते-
६००
.....
२८ हजार मेट्रिक टन खत नगरमध्ये पडून
चालूवर्षी नगर जिल्ह्यासाठी २८ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. रेल्वे माल धक्क्यावरून हे खत ठोक विक्रेत्यांना पाठविण्यात आले आहे. परंतु, दुकाने बंद असल्याने खत ग्रामीण भागातील दुकानदारांना पोहोच झालेले नाही.
....
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काही भागात कपाशी लागवडीला सुरुवात होते. ज्या भागात पाणी आहे, अशा तालुक्यांतील शेतकरी बियाण्यांची मागणी करत आहेत. परंतु, दुकान बंद आहे. तसेच बियाणे कंपन्यांकडून आलेले नाही. त्यामुळे बियाण्यांची विक्री सुरू झालेली नाही.
- कृषी सेवा केंद्र चालक
......
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना नवीन जातीची बियाणी व खते वेळेत उपलब्ध होणे गरजेचे आहे. कोरोनामुळे दुकाने बंद असल्याने बियाणे व खते मिळत नाहीत. याबाबत सरकारने ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना खत व बियाणे वेळेत उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून खरीप हंगामास विलंब होणार नाही.
- अशोक ढगे, कृषी शास्त्रज्ञ, नेवासा
....
कपाशीची एक बॅग व बाजरीचे बियाणे पाहिजे आहे. परंतु, दुकाने बंद आहेत. दोनवेळा दुकानात जाऊन आलो. पण, बियाणे मिळाले नाही. दुकाने सुरू करून बियाणे उपलब्ध करून द्यावे.
-सीताराम बर्डे, शेतकरी, ताजनापूर, ता. शेवगाव
......
उसासाठी युरिया, डीएपीच्या बॅगची मागणी कृषी सेेवा केंद्रात केली असता दुकाने बंद असल्याचे सांगण्यात आले. पाऊस येण्यापूर्वी खत टाकायचे होते. परंतु कोरोनामुळे दुकाने बंद असल्याने अडचणी येत आहेत.
- पांडुरंग आर्ले, शेतकरी, शेवगाव