श्रीगोंदा : कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथील मायलेकराची दृष्टी नसल्याने अंधारमय परिस्थितीशी एकाकी झुंज सुरू होती. त्यांना दृष्टी देणारे दाते भेटले आणि या आदिवासी माता-पुत्रास नवी दृष्टी मिळाली. त्यामुळे भोसले परिवारात ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’, अशी चैतन्यमय परिस्थिती निर्माण झाली आहे.
परिघा भोसले व सुयोग भोसले असे मायलेकराचे नाव आहे. परिघा भोसले यांना पाच मुले. चार मुले गतिमंद आहेत. घुगल वडगाव येथील महामानव बाबा आमटे संस्थेत शिक्षण घेणाऱ्या सुयोगला एका डोळ्याने कमी दिसत होते. त्यातच दुसऱ्या डोळ्याची अचानक दृष्टी गेली. परिघा यांची मोतीबिंदूमुळे दृष्टी गेली आणि अंधारमय परिस्थिती निर्माण झाली.
शस्त्रक्रिया करणे अवघड होते.
ही माहिती श्रीगोंदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश बोरा यांना समजली. त्यांनी भोसले परिवारास आधार दिला. पुण्यातील बुधराणी इनलॅक्सच्या मदतीने सुयोग भोसले, परिघा भोसले यांच्या डोळ्यांवर डाॅ. गिरीश पाटील, माया आल्हाट, विशाल भिंगारदिवे यांनी शस्त्रक्रिया केली. यामुळे मायलेकरास नवी दृष्टी मिळाली.
---
दु:खी डोळ्यांतून आनंदाश्रू
परिघाबाई, सुयोग यांची दृष्टी गेल्याने त्यांच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू वाहत होते. मात्र, शस्त्रक्रिया झाली आणि गेलेली दृष्टी पुन्हा आली आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले .
---
सात हजार ज्येष्ठांना दृष्टी..
सतीश बोरा यांनी बुधराणी इनलॅक्सला महिन्यातून एक दिवस नेत्र तपासणी शिबिर घेण्यासाठी स्वत:चे मंगल कार्यालय गेल्या सहा वर्षांपासून मोफत उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे सात हजार आबालवृद्धांना दृष्टी लाभली आहे. बोरा यांनी रतनचंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मदतीचा हात दिला आहे.
---
०६ मायलेक
कोळगाव येथील मायलेकाला नेत्र शस्त्रक्रियेनंतर दृष्टी मिळाली.