संगमनेर : सचिन मेडिकल व जनरल स्टोअर्समध्ये शॉर्ट-सर्किट होवून लागलेल्या आगीत सुमारे १० लाखांचे सामान जळून खाक झाल्याची घटना शहरातील नवीन नगर रोडवर घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. पोलिसांची माहिती अशी, सोमवारी सकाळी नियमितपणे सुशील सुरेश शेवाळे (रा. मालदाडरोड) हे आपले नवीन नगर रोडवरील मेडिकल उघडण्यासाठी पावणे आठ वाजता आले असता आतून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने शहर पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी कळविल्यानुसार नगरपरिषद व थोरात साखर कारखान्याचे अग्नीशामक घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे वेगाने पसरत असलेले आगीचे लोट विझविण्यास मोठी मदत झाली. मात्र या आगीमध्ये दुकानातील गोळ्या-औषधे, इंजेक्शन, सलाईन, सर्जीकल मटेरियल, कॉस्मेटीक, फर्निचर, कॉम्प्युटर, इन्व्हर्टर, फ्रिज, टी.व्ही असे एकूण १० लाखांचे सामान जळून खाक झाले. पंचनामा करून पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. ही आग दुकानातील इलेक्ट्रीक वायरमध्ये झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचे समजते. पुढील तपास रावसाहेब कुसळकर करीत आहेत. (प्रतिनिधी)
संगमनेरात मेडिकलला आग
By admin | Updated: September 30, 2014 23:20 IST