अहमदनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाना सुरू करण्यात आल्या असून, पुढील काही दिवसांत टप्प्याटप्प्याने मुख्य बाजारपेठेसह इतर सर्व बाजारपेठा सुरू केल्या जातील, असे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.
आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी दुपारी आडतेबाजार, दाळमंडई भागाची पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांशी चर्चा करताना वरील माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक संजय चोपडा, सागर कायगावकर, अभय कोठारी, सचिन चोपडा, मयूर जामगावकर, स्वप्निल डुंगरवाल, निलेश संचेती, लाभेश मुथा आदी व्यापारी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, नगर शहरातील व्यापाऱ्यांनी गेल्या दीड वर्षापासून सहकार्याची भूमिका बजावत प्रशासनाला सहकार्य केले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना यश आले आहे. आता शहरातील सर्व बाजारपेठा टप्प्या-टप्प्याने सुरू होतील. गेल्या दोन महिन्यांपासून बाजारपेठा बंद असल्यामुळे हमाल माथाडी कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता आता. आडते बाजारासह, दाळमंडई, मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांची दुकाने सुरू झाली आहेत. हे सर्व व्यावसायिक शासनाच्या निर्देशांचे पालन करत आहेत. यापुढेही नियमांचे पालन करून व्यापारी प्रशासनाला सहकार्य करतील, असे जगताप म्हणाले. यावेळी शहरातील कापड बाजार,सराफ बाजार, इलेक्ट्रॉनिक असोसिएशनच्या व्यापाऱ्यांनी बाजारपेठ सुरू करण्याची मागणी केली.