अहमदनगर : महापौर संग्राम जगताप यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडल्यानंतर त्यांना महापौरासह नगरसेवकपदाचा राजीनामा देणे क्रमप्राप्त आहे. संग्राम जगताप यांच्या राजीनाम्यानंतर इच्छुक नगरसेवकांनाही महापौरपदाचे डोहाळे लागले आहेत. बाळासाहेब बोराटे, अजिंक्य बोरकर, अभिषेक कळमकर, विपुल शेटीया यांची नावे महापौर पदासाठी चर्चेत आली आहेत. विधीमंडळाचा शपथविधी झाल्यानंतरच जगताप राजीनामा देतील. त्यांच्या राजीनाम्यानंतर सारसनगर प्रभागात पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठीही अनेकांनी तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. लाभाची दोन पदे एकाच व्यक्तीला भोगता येत नाहीत. त्यामुळे संग्राम जगताप यांना महापौरांसह नगरसेवकपदाचाही राजीनामा द्यावा लागणार आहे. जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार पोटनिवडणूक व महापौरपदाचा निवडणूक कार्यक्रम घोषित होईल. हात उंचावून महापौरांची निवड होईल. त्यामुळे अपक्षांसह मनसेच्या नगरसेवकांचा ‘भाव’ चढणार आहे. आमदार अरुण जगताप यांनी अपक्ष, मनसेची मोट बांधत कॉँग्रेसला सोबत घेऊन राष्ट्रवादीचा महापौर केला होता. आता हीच मोट ते पुन्हा बांधतील का? याचीही चर्चा आहे. आमदारकी व महापालिकेतील सत्ता हातातून गेल्यानंतर सेनेकडूनही महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यादृष्टीने चाचपणी सुरू झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादीकडून बाळासाहेब बोराटे, अजिंक्य बोरकर, अभिषेक कळमकर व विपुल शेटीया यांची नावे महापौर पदासाठी चर्चेत आहेत. यातील बोराटे वगळता अन्य तिघेही महापालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच राजकारणात आले आहेत. बोराटे हे सात वेळा नगरसेवक म्हणून महापालिकेत कार्यरत आहेत. कॉँग्रेस, सेना, अपक्ष व राष्ट्रवादी असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. आ़ अरुण जगताप यांच्याशी असलेली जवळीक ही त्यांच्या जमेची बाजू आहे. संग्राम जगताप यांच्या आमदारकीसाठी दादा कळमकर यांनी दिलेली साथ पाहता तेही पुतण्या अभिषेकसाठी प्रयत्न करतील. मात्र आ़ अरुण जगताप ज्याच्या पारड्यात वजन टाकतील तोच महापौरपदी विराजमान होणार आहे. (प्रतिनिधी)
अनेकांना लागले महापौरपदाचे डोहाळे
By admin | Updated: October 21, 2014 00:59 IST