कोपरगाव : कोपरगावात रविवारी रॅपिड अँटिजेन तपासणीत ४, खासगी लॅब अहवालात १८ तर नगर येथील अहवालात ४२ असे तब्बल ६४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर पोहेगाव येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधित रुग्णांचा आकडा २२०वर गेला असून, रविवार हा कोपरगावकरांसाठी चिंता वाढवणारा ठरला.
रविवारी ४९ व्यक्तिंच्या घशातील स्त्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे तर १० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. गेल्या आठ दिवसांपासून दररोजच रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. यामध्ये सोमवारी १४, मंगळवारी २३, बुधवारी ३३, गुरुवारी २५, शुक्रवारी ३३, शनिवारी ३७ बाधित रुग्ण सापडले. मात्र, रविवारी रुग्णवाढीचा आलेख हा चालू आठवड्यासह गेल्या तीन-चार महिन्यांमधील सर्वाधिक असून, तब्बल ६४ बाधित रुग्ण आढळले आहेत.
.........
बेफिकिरी वाढली....
नागरिक, व्यावसायिक, काही सरकारी, खासगी कार्यालयांतील कर्मचारी यांच्याकडून मास्कचा वापर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. पोलीस प्रशासनाकडून दररोज ५०पेक्षा जास्त विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यातून हजारो रुपये दंडाची वसुली केली जात असली, तरीही परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे शासनाच्या निर्बंधांना एकप्रकारे तिलांजलीच देण्याचे काम होत आहे. त्यातूनच गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णवाढीचा आलेख चढता आहे.
.............
ज्या बाधित रुग्णांवर घरीच उपचार सुरु आहेत, ते घरी न थांबता बाहेर फिरत आहेत. ज्या लोकांचा थेट अन्य लोकांशी संपर्क येतो, असे लोकही नियम पाळत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, दिवसागणिक रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळणे गरजेचे आहे.
- डॉ. कृष्णा फुलसौंदर, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव.