गेली पस्तीस-चाळीस वर्षे संस्थानातील चढत्या आलेखाचे सक्रिय साक्षीदार असलेले बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, संरक्षण विभागाचे पर्यवेक्षक संजय पाटणी, साई मंदिरातील पुरोहित व पर्यवेक्षक मुकुंद कापरे, श्रीसाईनाथ रुग्णालयाच्या लॅब टेक्निशियन लिली यांच्यासह विविध विभागात पस्तीस ते चाळीस वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.
संस्थानचे सीईओ कान्हूराज बगाटे यांच्या हस्ते सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करून या कर्मचाऱ्यांना जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. संबंधित कर्मचारी दिर्घायु, निरोगी व आनंदित राहण्यासाठी साईबाबांना प्रार्थनाही करण्यात आली. यावेळी या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासह डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे व सर्व विभागांचे प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
तब्बल एकवीस कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने संस्थानमध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना संस्थानचे सीईओ बगाटे यांनी व्यक्त केली. साईसंस्थानने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या प्रगतीच्या प्रवासात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. संस्थानात काम करत असताना या कर्मचाऱ्यांचे नाव कोनशिलेवर कधी लागले नाही, परंतु त्यांनी केलेले काम नक्कीच उल्लेखनीय आहे. या कर्मचाऱ्यांचा आदर्श संस्थानात सेवा देणाऱ्या पुढील पिढीने घ्यावा, अशी अपेक्षाही बगाटे यांनी व्यक्त केली.
त्यावेळी संस्थानचे डेप्युटी सीईओ ठाकरे व मुख्यलेखाधिकारी घोरपडे यांच्यासह सेवानिवृत्त कर्मचारी उपकार्यकारी अभियंता आहेर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विकास शिवगजे यांनी केले.