अहमदनगर: बोल्हेगाव, रेणुकानगर भागात पिण्याचे पाणी वितरीत करणारी पाईपलाईन अपुरी असल्याने दीड हजार नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तर दुसरीकडे पाईपलाईन हडको भागात ड्रेनेज लाईन नसल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे. संतापलेल्या या भागातील नागरिकांनी महापालिकेत आंदोलन करून आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे तक्रार दिली. नगरसेवक कुमार वाकळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. रेणुकानगर, बोल्हेगाव येथे दीड हजार लोकवस्ती आहे. या भागातील ड्रेनेज लाईन जुनी आहे. अनेक ठिकाणी तिला गळती लागली आहे. त्यामुळे ड्रेनेजचे पाणी पुढे न जाता ते बाथरूममधून घरात येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. गांधीनगर भागात पाईपलाईन नसल्याने अनेक कुटुंबांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. गांधीनगरला जाणारा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. हा रस्ता दुरूस्त करण्याची मागणी नागरिकांनी यावेळी आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे केली. पाईपलाईन हडकोतील नागरिकांनीही महापालिकेवर मोर्चा काढला. नगरसेविका दीपाली बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आयुक्तांकडे तक्रार दिली. ड्रेनेज लाईन नसल्याने पावसाचे व सांडपाणी रस्त्यावर साचत आहे. पावसाचे साठलेले पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. त्या पाण्याने संसारोपयोगी वस्तू भिजल्या आहेत. ड्रेनेज लाईन त्वरीत टाकावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा बारस्कर यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)महापौरांना साकडेऔरंगाबाद रस्त्यावरील सूर्यनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ताच नाही. या नागरिकांनी महापौर संग्राम जगताप यांची भेट घेऊन त्यांनाच पर्यायी रस्ता द्यावा यासाठी साकडे घातले. माजी नगरसेवक निखील वारे यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने जगताप यांची भेट घेतली. भागातील रस्तेही खराब आहेत.
संतप्त नागरिकांचे मनपात आंदोलन
By admin | Updated: July 22, 2014 00:09 IST