अहमदनगर : पारनेरचे शिवसेना आमदार विजय औटी व सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यात पक्षांतर्गत शीतयुद्ध चालू असतानाच या शीतयुद्धात भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांनीही उडी घेऊन आ. औटींवर शरसंधान साधले. ‘नगर तालुक्याच्या जीवावर निवडून यायचे, व्ही. आय. पी. सारखे वागायचे आणि आमच्याच पुढाऱ्यांची अॅलर्जी करायची. असे असेल तर या निवडणुकीत आम्ही तुमची अॅलर्जी तपासू’ असा सज्जड इशाराच आ. औटींचे नाव न घेता भाजपा आमदारांनी सेना आमदारांना दिल्याने ऐन विधानसभा निवडणुकीत महायुतीचे वातावरण तापले आहे.पारनेर तालुक्यातील शिवसेना शाखांच्या फलकांवर जिल्हाप्रमुख प्रा.गाडेंचे नाव खटकल्याने नगर तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून आ.औटीं विरोधात रणकंदन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गाडे यांनी सेनेचा मेळावा घेऊन उमेदवारच (आ.औटी) यांना बदलण्यासाठी पक्षश्रेष्ठींना साकडे घालण्याचा इशारा दिला. काल आणि आज आ.कर्डिले यांनी पारनेर मतदारसंघात येणाऱ्या नगर तालुक्यातील गावा-गावात पक्ष बांधणी करून तिनही मतदारसंघात (राहुरी, श्रीगोंदा, पारनेर) नगर तालुक्याशिवाय पान ही हालणार नसल्याचे सुतोवाच केले. नगर तालुका शिवसेना व आ.औटी यांच्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर आ. कर्डिले काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कर्डिले म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना लिहिता-वाचता येत नाही, त्याच गोरगरीब शेतकऱ्यांना अर्ज देऊन भेटण्यासाठी सूचना करणारे आ.औटी स्वत:ला फार वेगळे समजतात. एखाद्या आठवड्यात डॉक्टराप्रमाणे कधीतरी मतदारसंघात येऊन आपला थाट दाखवायचा. कार्यकर्त्यांना अपमानाची वागणूक द्यायची ही कसली गुर्मी? असा सवाल करून आ. कर्डिले म्हणाले की, गाडे व कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले म्हणून आमदारकी मिळाली याचे भान राहिले नसेल तर आम्ही वेगळा पर्याय शोधू असा इशाराच आ. कर्डिले यांनी औटींचे नाव न घेता दिला. यावेळी संदेश कार्ले, हरिभाऊ कर्डिले, रामदास भोर, दिलीप भालसिंग, भाऊसाहेब काळे, संजय जपकर, संजय धामणे, रेवण चोभे, शरद दळवी, वसंत पवार आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)कार्यकर्ते एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न आ.कर्डिले यांनी त्यांच्या राहुरी मतदारसंघाबरोबरच नगर तालुक्याला सोडलेल्या श्रीगोंदा, पारनेर या तीनही मतदारसंघात आभार दौऱ्याचे नियोजन तालुका एकसंघ ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालवले आहेत. कार्यकर्ते एकसंघ राहिले तर जे राहुरीत करून दाखवले ते पारनेर व श्रीगोंद्यात करून दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला. आ.औटींच्या मतदारसंघातील गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांची आकडेवारी पाहिली की, ती नगर तालुक्याच्या पाठबळामुळेच असल्याचे दिसून येते. नगर तालुक्याची मते वजा केली तर आ.औटींची ढोंगी लोकप्रियता दिसून येईल, अशी टीका कर्डिले यांनी त्यांचे नाव न घेता केली. आभार दौऱ्यात काही कार्यकर्त्यांनी आ.औटी यांच्याबरोबरच खा. दिलीप गांधी यांच्यावर टिकेचा प्रहार केला. ते म्हणाले की, निवडणूक आली की खासदारांची पाठ दुखीनीट होते. निवडणुका संपल्या की पुन्हा पाठदुखी सुरू होते. त्यांची पाठदुखी सोयीचे राजकारण करते काय? असा सवाल कर्डिले समर्थकांनी केला.
‘महायुतीत’ रंगले ‘महानाट्य’
By admin | Updated: July 21, 2014 00:28 IST