संगमनेर : सरकारने राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करावीत. या मागणीसाठी शनिवारी (दि.११) संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मारुती मंदिरासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.
तालुकाध्यक्ष अशोक शिंदे, शहराध्यक्ष तुषार ठाकूर यांच्यासह रामा शिंदे, ऋषिकेश काळे, राज वाकचौरे, गनी मोमीन, शरद घुले, इरफान शेख, संजय शिंदे, अभिजित घाडगे, अस्लम शेख, युसूफ शेख, राजू लोखंडे, अंकित हासे, वैभव कानवडे, बाळासाहेब वावरे हे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
राज्यात कोरोना काळात मंदिरे व इतर धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शासनाने नियम शिथिल करून हॉटेल, मॉल, मद्याची दुकाने सुरू केली आहेत. सत्ताधारी व प्रमुख विरोधी राजकीय पक्षांचे विविध स्वरूपाचे कार्यक्रम सध्या राज्यात होत आहेत. त्यात जनयात्रा, मेळावे, आंदोलन-मोर्चे, कार्यालय उद्घाटन अशा कार्यक्रमांमध्ये हजारोंच्या संख्येने राजकीय कार्यकर्ते एकत्र जमतात. त्यावेळी कोरोनाच फैलाव होत नाही का? याचे उत्तर शासन आणि प्रशासनाने द्यावे. धार्मिक स्थळे उघडल्यानंतर परिसरातील व्यापाराला चालना मिळते. गोरगरिबांना रोजंदारी उपलब्ध होते. हे सर्व विषय व आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आल्याचे शहराध्यक्ष ठाकूर यांनी सांगितले.
.............
फोटो नेम : ११ मनसे आंदोलन, संगमनेर
ओळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मारुती मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.