टाकळी ढोकेश्वर : पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या तीन दिवसीय वार्षिक यात्रेच्या निमित्ताने पौष पौर्णिमेला परंपरेप्रमाणे तहसीलदार ज्योती देवरे यांच्या हस्ते सकाळी ६.३० वाजता मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत खंडोबाची विधिवत महाआरती, अभिषेक, महापूजा करण्यात आली. कोरोना पार्श्वभूमीवर यात्रा उत्सव रद्द करण्यात आला असून, दर्शन व्यवस्थाही बंद करण्यात आली आहे.
खंडोबाच्या महापूजेप्रसंगी नगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, देवस्थानचे अध्यक्ष ॲड.पांडुरंग गायकवाड, यात्रा समितीचे अध्यक्ष किसन धुमाळ, विश्वस्त किसन मुंढे, बन्सी ढोमे, खजिनदार हनुमंत सुपेकर, चिटणीस मनीषा जगदाळे, अमर गुंजाळ, बबन झावरे, शांताराम खोसे, गोपीनाथ घुले, भगवान भांबरे, चंद्रकांत कुलकर्णी, पंकज जगदाळे, येवले, लक्ष्मण सुंबरे आदी उपस्थित होते.
महापूजेअगोदर पहाटे चार वाजता खंडोबा स्वयंभू तांदळा मूर्तीला पुजारी देवीदास व दत्तात्रय क्षीरसागर, ज्ञानदेव घुले, सुरेश सुपेकर, रामदास मुळे, अमर गुंजाळ यांनी गंगास्नान घातले. त्यानंतर, चांदीचे सिंहासन व उत्सव मूर्तीचे अनावरण करण्यात आले. यात्रेनिमित्त उत्सव मूर्तींना साजशृंगार करण्यात आला. पहाटे पाच वाजता देवस्थानचे पांडुरंग गायकवाड यांच्या हस्ते खंडोबाची आरती करण्यात आली. सकाळी दहा वाजता खंडोबा देवाच्या पालखीची मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत कोरठण खंडोबा मंदिर प्रदक्षिणा करण्यात आली. पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, मंदिरापासून दोन किमी अंतरावर पोलिसांनी देवस्थानकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत. खंडोबा मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, खंडोबा देवाचा पौष पौर्णिमेचा पिंपळगाव रोठा गावातील रात्रीचा पालखी छबीना, तसेच मंदिराजवळील रात्रीचा छबीना रद्द करण्यात आला आहे.