अहमदनगर : नागरी दलित वस्ती योजनेतील निधीची नव्याने स्थापन झालेल्या नगपरिषदांसह नगरपालिकांनाही लॉटरी लागली आहे़ पालकमंत्र्यांच्या कृपने ही लॉटरी लागली असून, त्यांच्या जामखेड नगरपालिकेलाही या निधीचा प्रसाद मिळाला आहे़ निधीत वाटेकरी वाढल्याने जुन्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर निधी वाटपात अन्याय झाला आहे़ नागरी दलित वस्ती योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनाने सात नगरपालिकांसह दोन नगरपंचायतींचा प्रस्ताव नगरविकास विभागाला पाठविला होता़ प्रस्तावाची दखल घेऊन नगरविकास विभागाने नगर जिल्ह्यासाठी २ कोटींचा निधी मंजूर केला़ हा निधी नऊ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आला होता़ निधी जुन्या नगपरिषदांसह नगरपंचायतींना वितरीत करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला़ मात्र, त्यात बदल करून नवीन नगरपरिषदा व नगरपंचायतींचाही समावेश करण्याचे आदेश झाले़ परिणामी २ कोटी निधीचे १४ वाटे असून, एक ना धड, भाराभर चिंध्या, अशीच अवस्था नागरी दलित वस्ती योजनेच्या निधीची झाली आहे़ जिल्हाप्रशासनाने १४ नगरपरिषदा व नगपंचायतींना हा निधी वितरीत केला़त्यामुळे श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, देवळाली प्रवरा, राहाता, पाथर्डी, श्रीगोंदा आणि शिर्डी नगरपंचायतींना दलित वस्तीतील कामे घेताना हात आखडता घ्यावा लागणार आहे़ नव्याने स्थापन झालेल्या अकोले, पारनेर आणि कर्जत नगरपंचायत परिसरातील दलित वस्तीत छोटी कामे करणे प्रशासनाला शक्य होईल़ याशिवाय शेवगाव व जामखेड नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनाही दलित वस्तीतील कामे सूचविता येतील़ जिल्ह्यात पूर्वीच्या सात नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायती आहेत़ त्यात दोन नगरपालिका, चार नगरपंचायतींची भर पडली़ नेवासा नगरपंचायत नव्याने स्थापन झाली आहे़ त्यामुळे नेवासा नगरपंचायतीस निधीपासून दूर ठेवण्यात आले आहे़ शेवगाव व जामखेड नगरपरिषदांची दोन दिवसांपूर्वी निवडणूक झाली़ त्यांनाही या निधीत वाटा देण्यात आला आहे़ या निर्णयामुळे नगरपालिकांना मिळणाऱ्या निधीत कमालीची घट झाल्याने एकाही शहरातील मोठी कामे हाती घेणे शक्य होणार नसल्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी) महापालिकेला एक कोटी वितरीत नागरी दलित वस्ती योजनेंतर्गत महापालिकेला स्वतंत्र एक कोटीचा निधी वितरीत करण्यात आला़ मागील वर्षीच्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र दिल्यानंतरच हा निधी मिळणार आहे़ महापालिकेने मागील वर्षीच्या खर्चाचे तसे प्रमाणपत्र अद्याप दिले नाही़ त्यामुळे महापालिकेचा निधी परत जाणार की खर्च होणार, याबाबत साशंकता आहे़
वितरीत केलेला निधी असा: श्रीरामपूर- ४४ लाख ९९ हजार ४००, संगमनेर-९ लाख ३७ हजार ८००, कोपरगाव-२८ लाख २८ हजार ३२०, राहुरी-१५ लाख ७४ हजार ७०, देवळाली प्रवरा-१२ लाख ६ हजार ५५०, राहाता-१० लाख २० हजार, पाथर्डी-७ लाख ४० हजार, श्रीगोंदा- १० लाख ५० हजार, शिर्डी-१९ लाख ६३ हजार, अकोले- ४ लाख ४५ हजार, कर्जत- ७ लाख १५ हजार, पारनेर- २२ लाख ७ हजार, शेवगाव- १५ लाख ७५ हजार, जामखेड- १२ लाख १४ हजार.