शेवगाव : ४ व ५ सप्टेंबरला झालेल्या अतिवृृष्टीने शेवगाव तालुक्यातील बोधेेेगाव, कांबीसह आसपासच्या १६ गावांना चांगलाच तडाखा बसला. यामध्ये शेतकरी, व्यावसायिक यासह इतर वेगवेगळ्या प्रकारचे सात कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे.
प्रशासनाकडून जिरायत शेतीसाठी प्रतिहेक्टर ६ हजार ८००, बागायत १३ हजार ५०० तर फळबागांसाठी १८ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
३० व ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नानी, नंदिनी नद्यांना पूर येऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ४ व ५ तारखेला पुन्हा तालुक्यातील पूर्व भागात अतिवृष्टी होऊन शेतकरी, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये कांबी, हातगाव, गायकवाड जळगाव, बोधेगाव, लाडजळगाव, शिंगोरी, राणेगाव, मुंगी, सुकळी, मुरमी, शेकटे, बालमटाकळी, बाडगव्हाण, कोनोशी, वाडगाव, मुर्शतपूर आदी गावात पिकांचे मोठे नुकसान झाले.
पूर्व भागातील वरील गावात ५ हजार ७७३ शेतकऱ्यांचे ५ हजार २६६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यासाठी ४ कोटी २१ लाख ४६ हजार रुपये, घरात शिरलेल्या पाण्याने नुकसानीस १ लाख ५० हजार, वाहून गेलेल्या जनावरांची भरपाई १ लाख ७८ हजार ८५० रुपये, घरांची पडझड १ लाख ५० हजार रुपये, नष्ट घरांसाठी ९५ हजार रुपये, वाहून गेलेल्या शेतीस ३ लाख असा जवळपास ७ कोटी रुपये मदतीचा अहवाल सादर केला आहे.
तालुका प्रशासनाच्या वतीने तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांच्या मदतीने युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचीच आकडेवारी शासन दरबारी पाठविण्यात आली आहे.
----
पुरात वाहून गेलेल्यांच्या कुटुंबास चार लाखांची मदत
वडुले नदी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने येथील माजी सरपंच मुरलीधर सागडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबास आपद्ग्रस्त निधीतून ४ लाख रुपयांचा धनादेश तहसीलदार अर्चना पागिरे, सरपंच प्रदीप काळे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.