अळकुटी : पुणे येथील रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्या माजी अध्यक्षा अनघा रत्नपारखी यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच दिशा फाउंडेशन व आपलं गाव फाउंडेशन यांच्या सहकार्यातून बाभूळवाडे (ता. पारनेर) येथील महिलांना पशुधनाची (गायी) भेट देण्यात आली.
बाभूळवाडे गावातील ज्या महिला शेतकऱ्यांच्या नावे जमीन आहे. ७/१२ आहे अशा १९ महिला शेतकऱ्यांना जर्सी (एच.एफ.) गायींचे वाटप करण्यात आले. रोटरी मार्फत ग्लोबल ग्रॅण्ट (तैवान) येथून या प्रकल्पाकाठी प्रत्येक महिला शेतकऱ्याला ३० हजार रुपये आर्थिक सहाय्य करण्यात आले. हा प्रकल्प राबविला गेल्यामुळे एक प्रकारे ५ लाख ७० हजार रुपये परदेशी मदत रोटरीमार्फत गावाला मिळाली.
महिला सशक्तीकरण व सबलीकरण हा योजनेचा मुख्य उद्देश असून ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना यामुळे उत्पन्नाचे एक साधन मिळाले आहे. या प्रकल्पा अंतर्गत सर्व महिला शेतकऱ्यांना प्रत्यक्ष गायींच्या बाजारात भेट देऊन आपल्या पसंतीची गाय खरेदीची मुभा दिली गेली. त्यामुळे सर्व महिला शेतकऱ्यांनी रोटरीमार्फत मिळणाऱ्या अनुदानात वैयक्तिक भर टाकत चांगल्या प्रतीच्या गायी खरेदी केल्या. दूध विक्रीतून या महिलांना अर्थार्जन तर होईलच परंतु, भविष्यात टप्प्याटप्य्याने दुग्ध व्यवसायाचा विस्तार देखील करता येईल. गावासाठी केलेल्या या विशेष सहकार्याबद्दल या सर्व महिला शेतकऱ्यांनी रोटरी टीम, दिशा टीम व अनघा रत्नपारखी यांच्यासह आपलं गाव फाउंडेशनचे आभार मानले.