लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्ह्यातील रहिवासी असलेले काही नागरिक परदेशात वाहन चालविण्याचा परवाना काढतात. आंतरराष्ट्रीय परवाना काढण्यासाठी जिल्ह्यातून प्रत्येक वर्षी ५० ते ६० अर्ज येथील उपप्रादेशिक परिवहन विभागात येतात. या परवान्याची मुदत मात्र एक वर्षाची असते. ही मुदत संपल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परवान्याचे नूतनीकरणही करता येते.
जिल्ह्यातून परदेशात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. काही नागरिक नोकरीनिमित्ताने परदेशात वास्तव्यास आहेत. काही व्यवसायानिमित्ताने तर काही पर्यटनासाठी परदेशात जात असतात. काही नागरिक हे त्या ठिकाणी वाहन चालविण्याची परवानगी मिळावी यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाना मिळणे आवश्यक असते. त्यासाठी आरटीओ विभागात अर्ज करावा लागतो. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील २४७ जणांनी असा परवाना काढला आहे. कोरोनामुळे मात्र आंतरराष्ट्रीय परवाना काढणाऱ्यांची संख्या घटली असून चालू वर्षात अवघ्या सात जणांनीच हा परवाना घेतला आहे.
----------------------
असा काढता येतो आंतरराष्ट्रीय वाहन परवाना
आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा उपयोग करता येतो. त्यासाठी वाहनधारकाची अधिकृत कागदपत्रे असणे आवश्यक आहे. परदेशात वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय परवाना हा केवळ एका वर्षासाठी ग्राह्य धरला जातो. परवान्याची मुदत संपल्यानंतर वाहनधारक परदेशात असेल तर तेथील परराष्ट्र मंत्रालयात अर्ज करावा लागतो. ऑनलाइन कागदपत्रे द्यावी लागतात.
---------------------
कोण काढतो हा परवाना
भारताबाहेर परदेशात वाहन चालविण्यासाठी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स असणे अत्यावश्यक बाब आहे. बहुतांशी देशात वाहतुकीचे नियम खूपच कडक आहेत. नियमभंग झाला तर मोठा दंड आकारला जातो. त्यामुळे विशिष्ट काळासाठी ज्यांना परदेशात जायचे आहे व तेथे वाहन चालविण्याची गरज भासणार आहे असे लोक अशा स्वरूपाचे लायसन्स काढतात. गेल्या पाच वर्षांत २०१९ मध्ये सर्वाधिक ८७ जणांनी हे लायसन्स काढले आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे २०२० मध्ये ३१ तर चालू वर्षी आतापर्यंत अवघ्या ७ जणांनी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढले आहे.
---------------------------
किती जणांनी काढले इंटरनॅशनल लायसन्स?
२०१७- ५६
२०१८- ६६
२०१९- ८७
२०२०- ३१
२०२१- ०७
एकूण- २४७