अहमदनगर : सुलभ आणि वेगवान संपर्काचे माध्यम म्हणून शासकीय कामकाजातही मोबाइलचा वापर अपरिहार्य बनला आहे. परंतु, मोबाइलवर बोलताना अपेक्षित शिष्टाचार पाळला जात नसल्याचे शासकीय कार्यालयात दिसून येते. काम कमी आणि कानाला मोबाइल जास्त अशीच स्थिती सर्व कार्यालयात दिसून येते. यामुळे सामान्य नागरिक नको ते काम, असेच बोलू लागले आहेत.
शासकीय कार्यालयात मोबाइलवर जास्त बोलणे, जोराने बाोलणे, जास्त वेळ बोलणे याला बंदी घातली आहे. मोबाइलवर बोलताना काय काळजी घ्यायची, अशा सूचना सरकारने केल्या आहेत. नगर शहरातील अनेक शासकीय कार्यालयांत मात्र मोबाइलवर बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त दिसून आली आहे.
............................
१) काय आहे आचारसंहिता?
कार्यालयीन कामासाठी केवळ कार्यालयीन दूरध्वनीचा वापर करावा. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक तेव्हाच मोबाइलचा वापर करावा. मोबाइलवर सौम्य आवाजात बोलावे, वाद घालू नये. कार्यालयीन कामासाठी मोबाइलचा वापर करताना टेक्स्ट मेसेजचा वापर करावा. मोबाइलवर आलेले अत्यावश्यक वैयक्तिक कॉल बाहेर जाऊन घ्यावेत.
......................................
काम नावाला, मोबाइल कानाला
१) जिल्हाधिकारी कार्यालय
येथील कोणत्याही विभागात गेले की कर्मचारी मोठ्या प्रमाणात मोबाइलवर बोलत असतात. अनेक शासकीय कामदेखील मोबाइलवरूनच केले जातात. त्यामुळे त्याचा आधार घेत अनेक कर्मचारी मोबाइलवरच बोलताना आढळून येतात
.....
२) महापालिका
महापालिकेतील कर्मचारीही मोबाइलवर बोलण्यात व्यस्त राहतात. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा कामात व्यस्त आहे, असे जरी सांगत असले तरी आरोग्य विभागातील आस्थापनेतील कर्मचारी मोबाइलवर वेळ घालवित असल्याचे दिसून आले.
................................
कार्यालय प्रमुख म्हणतात....
कार्यालयीन कामासाठी आवश्यक तेवढाच मोबाइलवर बोलता येईल. स्वत:च्या खासगी कामाने मोबाइलवर बोलू नये. मोबाइलवर बोलताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. कार्यालयातील वरिष्ठांच्या कॉलला तत्परतेने उत्तर द्यावे.
- उपायुक्त, सामान्य प्रशासन, महापालिका
......................
भ्रमणध्वनीवर कार्यालयीन कामकाजासाठी समाजमाध्यमांचा वापर करताना वेळेचे व
भाषेचे भान असावे. अत्यावश्यक वैयक्तिक बोलायचे असेल तर कार्यालयाबाहेर जाऊन बोलावे, बैठकीत मोबाइलचा वापर करू नये, अशा शासनाच्या सूचना आहेत.
- तहसीलदार, महसूल प्रशासन
....................
सरकारी कार्यालय नको रे बाबा!
सरकारी कामकाजासाठी कार्यालयात गेल्यावर कर्मचारी आपल्या मोबाइलवरच व्यस्त असतात. माहिती घेण्यासाठी तासन्तास त्यांच्या पुढे बसूनही ते मोबाइलवरच असतात. त्यांच्या मोबाइल ठेवण्याच्या प्रतीक्षेचा आम्हाला कंटाळा येतो.
- विष्णू चौधरी, घोडेगाव
............
शासकीय कामकाजासाठी कार्यालयात गेल्यावर आम्हाला कर्मचारी प्रतिसाद देत नाहीत. संगणकावर गेम खेळत बसतात किंवा फोनवर तासन्तास माेबाइलवर बोलतात. माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यावर रागावून टाळाटाळीची उत्तरे देतात.
- जितेंद्र कुंटे, नागरिक