तिसगाव : आठ महिन्यांनंतर जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील सरगड वस्तीवर बिबट्याचा वावर आढळून आला आहे.
गुरुवारी रात्री दादासाहेब सरगड यांच्या वस्तीवर बिबट्याने शेळीची शिकार केली. वनकर्मचारी कानिफ वांढेकर यांनी त्या परिसरात फिरून ठसे घेतले. शेळीच्या जखमांची नोंद घेत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांडेकर व वन अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी पंचनामा केला. जवखेडे फिडरला सध्या रात्रीची वीज उपलब्ध आहे. त्यामुळे उसाला पाणी देण्यास गेलेल्या सरगड यांना बुधवारी रात्रीही बिबट्याचे दर्शन झाले होते. जवखेडे, कामत शिंगवे, आडगाव, वाघोली, कोपरे ही गावे मुळा पाटचारीचे लाभक्षेत्रात आहेत. सध्या पाटचारीला आवर्तन सुरू आहे. पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल गवळी, भारत वांढेकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.