जगताप यांनी घराशेजारी गोठ्यात बांधलेली शेळी बिबट्याने संरक्षक जाळी उचकटून शेजारील उसाच्या शेतात ओढून नेली. यामुळे जगताप यांचे सुमारे पंधरा हजारांचे नुकसान झाले आहे. प्रवरा परिसरात बिबट्यांच्या मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. शेतात काम करताना, रस्त्याने फिरणाऱ्यांवर बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. उक्कलगाव, बेलापूर, केसापूर, आंबी, अंमळनेर हा भाग बागायती पट्टा असल्याने उसाचे मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी आयते घर मिळत आहे. बिबटे मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, वासरे, कुत्री या पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना भक्ष्य बनवित आहेत. गेल्या काही दिवसांत परिसरात मनुष्यांवर बिबट्यांचे हल्ले वाढल्याने या नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अंमळनेरचे सरपंच भारत जाधव, उपसरपंच किरण कोळसे, ग्रामपंचायत सदस्य दादा साळुंके, कोंडीराम साळुंके, रोहन जाधव, रवी पाळंदे, नंदकिशोर जाधव, आंबीचे सरपंच बाळासाहेब साळुंके, उपसरपंच विजय डुकरे आदींनी केली आहे.
---------