भोकर येथे शेतकरी दादासाहेब ज्ञानदेव मंडळके यांच्या वस्तीवर शनिवारी बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पडला. हल्ल्यात एक शेळी गंभीर जखमी झाली आहे. गावालगत गोरक्षनाथ देवस्थानाच्या मागील बाजूस असलेल्या वस्तीवर ही घटना घडली आहे. दुसरीकडे शिरसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात बिबट्याचा वावर आहे. पाळीव कुत्र्यांना त्याने लक्ष्य केले आहे. सरपंच आबासाहेब गवारे, गौरव यादव यांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. मात्र ही मागणी पूर्ण झालेली नाही. प्रवरा नदीच्या काठावर बिबट्याने जीवघेणे हल्ले केले. आता बिबटे तालुक्यातील ग्रामीण भागाकडेही सरकले आहेत. मात्र वनविभागाकडून कार्यवाहीची कुठलीही तत्परता दाखविली जात नाही. ग्रामस्थांचा बळी गेल्यानंतर वनविभागाला जाग येणार का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
--------