अहमदनगर : महापालिकेच्या विरोधी पक्षनेते व सभागृहनेते निवडीच्या हालचाली थंडावल्या असून, महापौरांनी महिला व बालकल्याण समिती विसर्जित करण्यासाठी सोमवारी सभा बोलवली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते व सभागृहनेते निवडीचे घोडे नेमके अडले कुठे, असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेत सत्तांतर झाले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली. महापौरपद सेनेकडे, तर उपमहापौरपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे. सत्ता स्थापनेनंतर सभागृहनेते व विरोधी पक्षनेत्यांची महापौरांकडून नेमणूक होत असते. असे असले तरी सभागृह नेतेपदासाठी सेनेकडून अद्याप नाव सुचविले गेले नाही. सत्ताधारी शिवसेनेत सभागृहनेते पदाबाबत एकमत झालेले नाही. भाजपची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. विरोधी पक्षनेतेपदावर सर्वप्रथम भाजपाने दावा केल होता; परंतु भाजपामध्ये विरोधी पक्षनेतेपदाबाबत कमालीचे मतभेद आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांची नेमणूक झालेली नाही. सत्ताधारी शिवसेनेतही सर्वकाही आलबेल आहे, असे नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यापाठोपाठ सभागृहनेत्यांची नेमणूकही लांबणीवर पडली आहे. सेना व भाजपामधील राजकीय घोळामुळे या नेमणुका लांबल्या आहेत. महिला व बालकल्याण समितीचे विसर्जन करण्याची मागणी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, सदस्य सचिन शिंदे, श्याम नळकांडे, समद खान यांनी केली. त्यानुसार महापौर रोहिणी शेंडगे यांनी समिती विर्सजनासाठी सभा बोलविली आहे. ही समिती विसर्जित करून नव्याने नियुक्त केली जाणार आहे.
....
कर्डिले यांच्या भूमिकेकडे लक्ष
महापालिकेच्या विरोधी पक्षनेता
नेमणुकीचे अधिकार भाजपाच्या वतीने माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना देण्यात आले आहेत. त्यांनी याबाबत मागील आठवड्यात बैठक बोलावली होती; परंतु ही बैठक रद्द झाली. माजी आमदार कर्डिले हे पुन्हा कधी बैठक बोलविणार विरोधी पक्षनेतेपदाची माळ ते कुणाच्या गळ्यात घालतात, याचीच सध्या उत्सुकता आहे.