शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ओंजळ रिकामी करणारे सरते क्षण... .आणि नावीन्याने भारलेले नवे कोरे मन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:21 IST

सरत्या वर्षाला निरोप देताना मनाची घालमेल समजता समजत नाही. हिशेब कोणताही असो जमा-खर्च मांडताना त्रास होतोच. या वर्षात वाटेवर ...

सरत्या वर्षाला निरोप देताना मनाची घालमेल समजता समजत नाही. हिशेब कोणताही असो जमा-खर्च मांडताना त्रास होतोच. या वर्षात वाटेवर आलेल्या अनपेक्षित क्षणांना सावरताना मनाची झालेली चलबिचल डोळ्यांसमोरून काही केल्या जात नाही. ती हतबलता मनाचा तळ शोधणारी. किती रहस्ये दडलेली असतात मनाच्या गाभाऱ्यात. असंख्य भावनांना जखडून ठेवतो आपण. यातल्या किती भावना ओठांवर येतात. राग, लोभ, द्वेष, मत्सर, असूया ही यादी खूप मोठी. या असंख्य भावनांच्या गर्दीत हरवताना स्वतःचेच हसू करून घेण्यातही मीपणा आडवा येतो. अनेकदा प्रयत्न करूनही हाताशी फार काही लागत नाही. हताश चेहऱ्यांमध्ये स्वतःला शोधताना मनाचे सांत्वन करून घेतो. बऱ्याच गोष्टी काळाच्या लाटेवर स्वार होतात. काळाची मात्रा सगळ्याच गोष्टींवर चालणारी.

कधीकधी अपेक्षा नसतानाही आनंदाची फुले आपल्या अंगणात पडत असतात. ती वेचताना मनस्वी सुख मिळते. तो दरवळ फार काळ टिकणारा नसला तरी क्षणिक आनंद देणारा मात्र नक्कीच असतो. खरे तर सुखाच्या व्याख्या व्यक्तिगणिक बदलत जाणाऱ्या. हे सुख जितक्या वेगाने येते तितक्याच वेगाने माघारी फिरते. मात्र, जगण्याची ऊर्मी आणि भिडण्याची ईर्षा आपल्या ओंजळीत टाकून जाते. काहींना तर सुखाचा भर पेलवतही नाही. निरपेक्ष आनंद उपभोगण्यापेक्षा ते क्षण हातातून निसटण्याची भीती जास्त. निसटत्या क्षणांना कुरवाळताना भविष्याची चिंता त्यांना सतावत असते. पेला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा, हे जीवनाचे तत्त्वज्ञान रुजेपर्यंत आयुष्याची संध्याकाळ समोर उभी असते. उद्याची चिंता करीत आजचा वर्तमान खराब करणारे पदोपदी भेटतात. आठवणींच्या हिंदोळ्यावर हेलकावे खाणारे काही कमी नाहीत. खरे तर भविष्यकाळ नसतोच. जगातले एकमेव सत्य हातातला वर्तमान काळ. सगळे काही कळत असूनही काही वळत नाही, हेच खरे जीवन.

सभोवतालेचे रथीमहारथी, सखे-सोबती काळाच्या पडद्याआड झालेले असताना आपण अजूनही पाय रोवून उभे आहोत. नियतीच बोलावणे कधी येईल हे सांगण अवघड. मग आहे ते क्षण यथेच्छ जगण्यासाठी मनाची कवाडे सताड उघडी का ठेवू नये. या धकाधकीच्या आयुष्यात आपण जगणेच विसरलो आहोत. जगाशी तर स्पर्धा करीतच आहोत. मात्र, स्वतःशीही करीत आहोत. या जीवघेण्या स्पर्धेच्या नादात सत्त्व हरवलेली माणसे नुसती धावताहेत कशासाठी, त्यांनाही माहीत नाही.

आज या वर्षाचा शेवटचा दिवस. निरोपाचे काहूर नेहमीप्रमाणे मनाची शांतता ढवळून काढणार. या सरत्या वर्षाला निरोप देताना वर्षभराचा सगळा पट डोळ्यांसमोर फिरतो. कितीतरी नवी माणसे आयुष्यात नव्याने जोडली. जोडलेली किती टिकवली आणि किती माणसे आपल्यापासून दूर गेली. पैशाच्या हिशेबापेक्षा हा कठीण हिशेब. असंख्य घटना या वर्षाने मनावर कोरल्या, कधीच न पुसता येणाऱ्या. कितीतरी कौतुकाचे क्षण वाट्याला आले. कितीतरी यशाच्या क्षणांनी अलगद हुलकावणी दिली. यश हातात आले असे वाटत असताना ते कापरासारखे अलगद उडून जावे. तो भ्रमनिरास वेदनादायक असतो. मनाची समजूत घालताना दमछाक होते खरी; पण तरी आपल्याला पुन्हा उभे राहावे लागो नव्या उमेदीने. जिवाभावाची माणसे अनपेक्षितपणे साथ सोडतात तेव्हा होणारा त्रास शब्दांत न मावणारा. स्वतःला घडविणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. रडविणारे क्षण काही कमी नसतात; पण हसविणारे क्षण चघळणे व रडविणारे क्षण गिळून घेणे, ही कला जमली की मग आयुष्य सुखद होते. या वर्षाची गोळाबेरीज करताना या वर्षाने खूप काही दिले ही भावनाच सुखावणारी. त्यामुळे या वर्षाला निरोप देताना कृतज्ञतेचा कुंभ ओतप्रोत ओसंडून वाहतोय.

व.पु. काळे एका कवितेत म्हणतात,

क्षणोक्षणी चुका घडतात

आणि श्रेय हरवून बसतात

आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला

खूप काही शिकवीत असतात....

जेव्हा आपणच आपला न्यायाधीश होतो, तेव्हा कळते की आपल्या हातूनही खूप चुका झाल्यात. अनेक माणसे कळत-नकळतपणे दुखावली गेली. त्यांचा दुरावा ठळकपणे जाणवतो आहे. ही माणसे आपल्या आयुष्याचा भाग होतील, अशी नव्या वर्षाकडून अपेक्षा. चुकणे शिकणे या दोन्ही गोष्टी अविरतपणे चालू असतात; पण चुकांतून शिकणे आणि तीच चूक पुन्हा न करणे यात खरे शहाणपण असते. हे शहाणपण नवीन वर्षात नक्कीच सोबत करील.

उद्याचा सूर्योदय प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-समाधान घेऊन येवो. या वर्षात प्रत्येकाच्या प्रयत्नांना यश मिळो. प्रत्येकाच्या अंगणात उत्तम आरोग्य नांदो, या सदिच्छांसह नव्या-कोऱ्या वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

…. संतोष दिवे, संगमनेर 9404696142

एम.ए.डी.एड.बी.एड.डी.जे.(पत्रकारिता) पी.एच.डी.(APP)

युवा मराठी साहित्य अभ्यासक