आश्वी : संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथे घरात घुसून विळ्याचा धाक दाखवून एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी पळविला़ घटनेबाबत मंदाबाई उत्तम कांजणे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मंदाबाई कांजणे या जनावरांना चारा टाकण्यास घराबाहेर आल्या असता जीन्स पॅन्ट व तोंडाला रुमाल बांधलेले दोन जण आले़ एकाने गळा दाबून तर दुसऱ्या चोरट्याने गळ्यातील सोन्याचे १५ ग्रॅम वजनाचे डोरले, दोन ग्रॅम वजनाचे रिंग काढून घेण्यास सुरुवात केली़ त्यावेळी सासू गोजराबाई ठकाजी कांगणे या घराबाहेर आल्या तेव्हा एका चोरट्याने सासूच्या गळ्याला विळा लावून जीवे मारण्याची धमकी देत गळ्यातील सोन्याची आठ ग्रॅम वजनाची पोत, अंगठी, नथ असे सुमारे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व १७०० रूपये रोख काढून घेत घरातून पळ काढला़ या वेळी आरडाओरड ऐकून शेजारी रहणारे अंकुश कांगणे व शिवाजी सानप मदतीला आले, मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले़ या घटनेची माहिती समजताच सहायक पोलीस निरीक्षक योगेश कमाले, उपनिरीक्षक बी़बी़ शिदे घटनास्थळी आले़ त्यांनी पंचनामा केला़ अज्ञात दोन चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(वार्ताहर)
विळ्याचा धाक दाखवून लाखाचा ऐवज पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 00:23 IST