अहमदनगर : मुंबईचे पोलीस उपायुक्त लखमी गौतम हे आता नगरचे नवे पोलीस अधिक्षक असणार आहेत. राज्याच्या गृह विभागाने आज दुपारी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यामध्ये लखमी यांची नगरला बदली करण्यात आली आहे. नगरचे पोलीस अधिक्षक आर.डी. शिंदे यांची बढतीवर मुंबईला बदली झाली आहे.सध्याचे पोलीस अधिक्षक आर.डी. शिंदे यांची सहा महिन्यांपूर्वीच बढती झाली होती. मात्र त्यांना नियुक्ती मिळाली नव्हती. बढतीनंतर त्यांना मुंबईचे वेध लागले होते. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे त्यांची बदली रखडली होती.अखेर शनिवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले. मुंबईच्या मध्य विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्त म्हणून त्यांची बदली झाली आहे. शिंदे यांची २० जुलै २०१२ रोजी नगरला बदली झाली होती. नगरमध्ये त्यांचा कालावधी दोन वर्षे १३ दिवसांचा राहिला आहे. शिंदे यांच्या काळात जिल्ह्यातील ग्रामपंचायती, महापालिका, लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. शांत असलेल्या शिंदे यांचा प्रशासनावर वचक होता, मात्र कृष्णप्रकाश यांच्यानंतर अपेक्षित असलेल्या कामगिरीबाबत जिल्हावासिय असमाधानीच राहिले. (प्रतिनिधी)शिस्तप्रिय गौतमनवे पोलीस अधिक्षक म्हणून येणारे लखमी गौतम हे मुंबईहून येत आहेत. तरुण असणारे गौतम हे अत्यंत शिस्तप्रिय आहेत. यापूर्वी बुलढाणा, बीड येथे पोलीस अधिक्षक होते. त्यांचा प्रशासनावर वचक असल्याने त्यांची कारकिर्दही लोकप्रिय ठरली आहे. बुलढाणा येथे गौतम यांच्या कार्यकाळात श्री. गजानन महाराज यांचा शताब्दी महोत्सव साजरा झाला होता. लवकरच ते नगरचा पदभार स्वीकारणार आहेत.
लखमी गौतम नवे पोलीस अधिक्षक
By admin | Updated: August 3, 2014 01:10 IST