----------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : माझ्या वडिलांना नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्या रुग्णालयात ऑक्सिजनची टंचाई होती. त्यामुळे त्या रुग्णालयाने आमच्या वडिलांना इतरत्र हलविण्यास सांगितले. रुग्णवाहिकेद्वारे त्यांना इतर ठिकाणी हलविण्यात आले. त्यावेळी रुग्णवाहिकेत जेवढा ऑक्सिजन होता, तेवढाच मिळाला. नंतर रुग्णालयात ऑक्सिजन नसल्याने वडिलांचा जीव गेला, असा खेद विनोद नलवडे यांनी व्यक्त केला.
देशात ऑक्सिजनअभावी एकाचाही मृत्यू झाला नाही, असे वक्तव्य केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी गत आठवड्यात केले होते. त्यामुळे ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी गेले, त्यांनी संतापाची भावना व्यक्त केली आहे. ऑक्सिजनअभावी कोणाचेच मृत्यू झाले नाहीत, असे सरकार सांगत आहे. मात्र आमचे बाबा, आमचे सासरे, आमच्या मित्रांचे वडील ऑक्सिजनअभावीच गेले. मग हे खोटे आहे का? ही झाली काही उदाहरणे, मात्र ऑक्सिजन न मिळालेल्या कितीतरी लोकांचे मृत्यू झाले आहेत. मात्र ते काही कोणी रेकॉर्डवर घेतलेले नाहीत, असे रुग्णांच्या नातेवाईकांनी ‘लोकमत’ला सांगितले. नगर शहरातील एका रुग्णालयात तर ऑक्सिजन न मिळाल्याने एकाच दिवशी सात जणांचा मृत्यू झाल्याचाही प्रकार घडला होता. मात्र तो प्रशासकीय पातळीवरून मान्य करण्यात आला नाही. एप्रिल-मे २०२१ मध्ये ऑक्सिजन नसल्याने अनेक रुग्णांचे जीव गेले. ऑक्सिजन सिलिंडर मिळविण्यासाठी नागरिकांनाच खूप मोठी धावपळ करावी लागली. सरकारी यंत्रणेकडून ऑक्सिजन मिळालेच नाहीत. एमआयडीसी कंपन्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची वेळ आली. त्यामुळे अनेक नागरिकांना प्राणास मुकावे लागले.
--------------
त्या दिवशी काय घडले...
माझ्या मित्रांचे वडील यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तिथे ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने इतरत्र हलविण्याचे डॉक्टरांनी सांगितले. आम्ही व इतर नातेवाईक यांनी एमआयडीसी गाठून ऑक्सिजनचे सिलिंडर आणले. कोणताही आजार नसताना ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. त्यामुळे आम्ही सगळे चिंताग्रस्त होतो. ऑक्सिजन कसाबसा आणला, मात्र त्यांना वाचविण्यात यश आले नाही.
-संतोष ढगे, विसापूर
-------------
नगर शहरात एका खासगी रुग्णालयात वडिलांना दाखल केले होते. तिथे ऑक्सिजनची मोठी टंचाई होती. त्यांना इतर ठिकाणी दाखल करायचे म्हटल्यावर आमच्या अंगावर काटाच आला. २७ एप्रिल २०२१ चा तो दिवस होता. ऑक्सिजन असते तर आमचे वडील वाचले असते. सरकार सांगत आहे की ऑक्सिजनअभावी एकाचाही मृत्यू झाला नाही, मात्र प्रत्यक्ष काय झाले होते, हे सरकारने कुठे पाहिले?
-विनोद नलावडे, मुलगा
--------------
ऑक्सिजनअभावी कितीतरी कोरोना रुग्णांचा प्राण गेला आहे. मात्र त्याची नोंद कुठेच आढळत नाही. दिवस-रात्र रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजन सिलिंडरसाठी धावपळ करीत होते. ऑक्सिजन सिलिंडर मिळेपर्यंत अनेक जणांचा जीव गेला आहे. मात्र केंद्र सरकार एकही मृत्यू झाला नसल्याचे सांगत आहे.
-नितीन भुतारे, नागरिक
------------
एप्रिल-मे या दोन महिन्यात तर ऑक्सिजन सिलिंडरसाठी शेकडो फोन आले. मदतीसाठी अनेकांनी याचना केली. खासगी दवाखान्यांनी तर ऑक्सिजन नसल्याने तुमचे रुग्ण आमच्या येथून हलवा, असेच सांगत होते. त्यामुळे प्रशासन, रुग्णालये यांच्याऐवजी रुग्णांच्या नातेवाईकांनाच ऑक्सिजनसाठी धावाधाव करावी लागली. यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले, ही सत्य परिस्थिती आहे.
-अभय आगरकर, माजी नगराध्यक्ष
-------
कोरोना स्थिती
एकूण रुग्ण
बरे झालेले
उपचार घेणारे
मृत्यू