कर्जत : तालुक्यातील रवळगाव येथील मजुरांनी केलेल्या कामाचे दाम मिळावे या मागणीसाठी थेट तहसील कार्यालय गाठले. मजुरांनी आपल्या समस्या मांडून या प्रकरणातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली. या मजुरांच्या भावना ऐकून रोजंदारी तहसीलदार किरण सावंत यांनी त्यांना रोजंदारी मिळवून देण्याची ग्वाही दिली. कर्जत तालुक्यातील रवळगाव येथे गेल्या दोन महिन्यांपूर्वी मनरेगा योजनेमधून बंधारा व वृक्षारोपण ही कामे केली होती. मात्र या दोन्ही कामात ज्या मजुरांनी जादा काम केले, त्यांना कमी रोजगार मिळाला. तर ज्या मजुरांनी कमी काम केले, त्यांना जादा रोजगार मिळाला, असे काही प्रकार मजुरांनी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब साळुंके यांच्या कानावर घातला. यानंतर साळुंके यांनी या मजुरांना घेऊन कर्जतचे तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार किरण सावंत यांना मजुरांनी आपल्या सर्व समस्या सांगितल्या. याप्रकारास कामाचे मोजमाप घेणारे रंगनाथ दराडे, ग्रामसेवक अनिल भोईटे, सरपंच तात्या खेडकर हेच जबाबदार आहेत, असा आरोप या मजुरांनी तहसीलदारांसमोर केला. तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी या मजुरांनी केली. तहसीलदारांच्या आश्वासनामुळे या मजुरांचे समाधान झाले. यावेळी माजी उपसभापती किरण पाटील हजर होते. (तालुका प्रतिनिधी)
मजूर धडकले तहसीलमध्ये
By admin | Updated: October 5, 2016 00:20 IST