निघोज : निघोज ही पारनेर तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. येथील यापूर्वीच्या काही घटना पाहता अतिसंवेदनशील गाव म्हणून या याकडे पाहिले जाते. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून अतिदक्षता घेतली जात आहे. निवडणूक काळात नागरिक,कार्यकर्त्यांनीही शांतता राखून प्रशासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी केले.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत निघोज येथे ते बाेलत होते.
बळप म्हणो, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करू. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॕॅनर लावताना परवानगी घ्यावी. एकमेकांवर टीकाटिपण्णी करताना गुन्हा दाखल होणार नाही याचीही काळजी घ्यावी. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मालकांनीही नियमांचे उल्लंघन करू नये. कायदा सर्वांसाठी सारखाच आहे, हे लक्षात ठेवून शांततेचा भंग होणार नाही याची पुरेपुर दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सरपंच ठकाराम लंके, उपसरपंच बाबाजी लंके, संदीप पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन वराळ, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोञे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक निकम, ग्रामपंचायत सदस्य मंगेश लाळगे, मंगेश वराळ, भिमा लामखडे, सुधीर पठारे आदी उपस्थित होते.