तीन महिन्यांत साडेपाच लाखाचे कलिंगड
By admin | Updated: April 27, 2017 18:46 IST
श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक दादासाहेब औटी यांनी आढळगाव येथील शेतीत उन्हाळी पिकाचे नियोजन करताना एक हेक्टर क्षेत्रात सुमारे साडेपाच लाखांच्या कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे.
तीन महिन्यांत साडेपाच लाखाचे कलिंगड
बाळासाहेब काकडे /श्रीगोंदा, दि. २७- श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक दादासाहेब औटी यांनी आढळगाव येथील शेतीत उन्हाळी पिकाचे नियोजन करताना एक हेक्टर क्षेत्रात सुमारे साडेपाच लाखांच्या कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे.दादासाहेब औटी यांना ४० एकर शेती असून सतीश व चंद्रकांत हे बंधू शेतीचे नियोजन पाहतात. औटीवाडी तलावातील पाण्यावर त्यांनी ऊस, लिंब, डाळिंबाची शेती फुलविली आहे. या वर्षी बाजार पेठेचा अंदाज घेऊन आढळगाव शिवारातील मळ्यात ठिबक सिंचन व मल्चिग पेपरचा वापर करून शुगर केन जातीचे कलिंगड लावले. कलिंगडास बाजार भाव काय मिळेल यांचा विचार न करता जास्तीत जास्त उत्पादन कसे काढता येईल याकडे लक्ष दिले. सुनील ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत औटी यांनी कलिंगड पिकास पाणी, खते, तसेच इतर व्यवस्थापन केले. त्यामुळे कलिंगडाचे पीक जोमात आले. एक हेक्टर क्षेत्रात ७५ मेट्रिक टन उत्पन्न मिळाले. एका कलिंगडाचे वजन पाच ते दहा किलो दरम्यान होते. मुंबई येथील फळे व्यापारी छोटूभाई यांनी जागेवर येऊन कलिंगडाची खरेदी केली. मुंबईच्या बाजारपेठेत दादासाहेब औटी यांच्या कलिंगडाने चांगलाच भाव खाल्ला. उत्पादन खर्च वगळता सुमारे चार लाखांची कमाई कलिंगड पिकातून अवघ्या तीन महिन्यात त्यांना झाली आहे.